पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी –
आपल्या गावातील व्यापारी,
व्यावसायिक यांच्या हितांचे रक्षण,दिवाळीच्या काळात त्यांचा व्यवसाय वाढवा या हेतूने रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने “माझे गाव माझे दुकान”ही जन जागृती “मोहीम हाती घेण्यात आली आहे.आपली खरेदी शक्यतो आपल्या गावात , आपल्याच तालुक्यात करण्याचे आवाहन रोटरी क्लब ने केले आहे.
विसरू नका..
“आपली माती,आपली माणसं ” अशी साद रोटरी क्लब ने घातली आहे
सध्या ग्राहक मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन खरेदी करताना दिसतो,हे ऑनलाईन खरेदीचे वेड लहान लहान गावांपर्यंत पोहचले आहे. शिवाय अनेक जण खरेदी साठी नजीकच्या लहान -मोठ्या शहरात जाताना दिसतात . त्यामुळे आपल्या गावामधील , शेजारच्या गावातील, आपल्याच तालुक्यातील व्यावसायिकांच्या छोट्या मोठया व्यवसायावर याचा परिणाम होतो. त्यामुळे आपल्या गावातील आपल्या दुकानात, आपली खरेदी अकोले तालुक्यातच व्हावी, व त्याचा फायदा आपल्याच माणसांच्या व्यवसाय वृद्धीसाठी व्हावा या हेतूने रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने ही चळवळ मागील वर्षांपासून सुरु करण्यात आली आहे.
अकोले शहरातील बाजार तळ, ,महात्मा फुले चौक,रुंभोडी अशा मोक्याच्या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावून अकोले तालुक्यातील ग्राहकांना आपल्याच तालुक्यात खरेदी करावी असे आवाहन करीत आहे.
या फ्लेक्स बोर्ड वर माझे गाव.. माझे दुकान.., आपली खरेदी आपल्याच तालुक्यात…, विसरू नका आपली माती.. आपली माणसं..अशा आशयाचा मजकूर छापलेला आहे.
विशेष म्हणजे या फ्लेक्स बोर्ड साठी अकोले शहरातील व्यावसायिक विक्रम नवले(प्रवरा क्लॉथ सेन्टर), सचिन आवारी( लालतारा मेडिकल शॉपी)आणि निलेश देशमुख(सुदर्शन प्लाय&हार्डवेअर),राजू मालुंजकर (राजपुष्य फ्लेक्स अँड फोटोग्राफी),गुरुकृपा क्लॉथ सेन्टर, रुंभोडी हे स्वतः हुन पुढे आले असून त्यांनी आपल्या व्यवसायाच्या व स्वतः च्या नावाने प्रत्येक बोर्ड साठी सौजन्य देऊन या चळवळी साठी प्रोत्साहन दिले आहे.
अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय सुरु करताना बँकेकडून कर्ज घेतात, काही जण आपली एखादी प्रॉपर्टी विकून व्यवसाय सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक युवकांना, युवतींना रोजगार मिळत असतो.त्यामुळे अनेकांचे संसार उभे राहतात. याच व्यवसायावर अनेकांचे भवितव्य अबलंबून असते. त्यामुळे या व्यवसायांना प्रोत्साहन देणे, आपले चलन आपल्याच गावात, तालुक्यात फिरल्यास त्यामुळे इतर व्यवसायांनाही चालना मिळते, गावाची, तालुक्याची प्रगती होते. या दृष्टीने ग्राहकांनी आपली खरेदी आपल्याच तालुक्यात करणे आवश्यक आहे. अन्यथा या छोट्या मोठ्या व्यवसायिकाना आर्थिक फटका बसू शकतो, ते तोट्यात गेल्यास अनेकांचे रोजगार बुडू शकतात. अनेकांचे संसार बुडू शकतात. म्हणून रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने ही चळवळ सुरु करण्यात आली आहे. या चळवळीत अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे व आपली खरेदी आपल्याच माणसाच्या दुकानातून करावी व तालुक्याच्या
अर्थकारणाच्या प्रगतीला हातभार लावावा असे आवाहन रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते, सचिव अमोल देशमुख, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी खजिनदार संदीप मोरे,सह सचिव समीर सय्यद,पब्लिक इमेज हभप दीपक महाराज देशमुख, सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे. रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत असूनअनेक नागरिकांनी तालुक्यातच खरेदी करणार असल्याचे रोटरी च्या सदस्यांना फोनवरून सांगितले आहे.


