पून्य वार्ता
शिर्डी (प्रतिनिधी) – समाज कल्याण न्यास या संस्थेमार्फत गेल्या २२ वर्षांपासून अखंडपणे भिवंडी ते शिर्डी पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षीही भक्तिमय वातावरणात, मोठ्या उत्साहात आणि निष्ठेने पालखीने शिर्डीत प्रवेश केला.
शिर्डीतील साई पालखी निवारा येथे पालखीचे आगमन होताच पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि “साईराम” च्या जयघोषात स्वागत करण्यात आले. या वेळी उपस्थित साईभक्तांच्या डोळ्यांत भक्तिभावाने पाणी तरळले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने डॉ. सोन्या पाटील यांचा आणि “साईबाबांचा दिवाना” म्हणून प्रसिद्ध असलेल्या जे. के. पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या गौरवसोहळ्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपली उपस्थिती दर्शवत पालखी सोहळ्याचे सामाजिक व आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की, “या प्रकारचे उपक्रम समाजामध्ये श्रद्धा, एकता आणि सेवा भावना वृद्धिंगत करतात. समाजकल्याण न्यासाचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.”
शिर्डीमध्ये पालखीचे आगमन हा एक भक्ती, सेवाभाव आणि सामाजिक एकात्मतेचा उत्तम संगम ठरतो. या दिव्य सोहळ्याचे यशस्वी आयोजन आणि सहभाग यामुळे शिर्डीतील वातावरण भक्तिमय आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारे ठरले.


