पुन्य वार्ता
अहिल्यानगर:
कर्ज घेणे हे प्रगतीचे लक्षण असले, तरी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे हे बाजारातील आपली पत वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले. “शेतात खत, नाकात नथ, बाजारात पत” ही म्हण अधोरेखित करत त्यांनी आर्थिक शिस्तीचे महत्त्व स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने डॉ. विश्वासराव आरोटे यांनी मंगेश सुरवसे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दैनिक समर्थ गांवकरी समूहाचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्याचे सहकार क्षेत्रातील योगदान
अहिल्यानगर जिल्ह्याने सहकार क्षेत्राला नेहमीच दिशा दिली आहे. या जिल्ह्यात साखर कारखाने आणि पतसंस्थांचे मोठे जाळे आहे. राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षाही पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवण्याला ठेवीदार आजही प्राधान्य देतात, असे सुरवसे यांनी नमूद केले. सहकार चळवळ ही बळीराजाला प्रगतीकडे नेणारी असून, महाराष्ट्राला नवी आशा आणि दिशा देण्याचे काम सहकार संस्थांनी केले आहे, असेही ते म्हणाले.
संस्थांच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक
संस्थांनी प्रगती साधण्यासाठी संचालक मंडळाने खर्चाला फाटा देऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन सुरवसे यांनी केले. त्याचबरोबर, सभासदांनीही संस्थेतील आपले व्यवहार पारदर्शक आहेत की नाही, याची माहिती घेत राहणे महत्त्वाचे आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून जिथे अडचण वाटते, तिथे तात्काळ विरोध करावा. जोपर्यंत सभासद संचालकांना प्रश्न विचारत नाहीत, तोपर्यंत संस्था सुरळीत चालणार नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितले.
ठेवीदारांचे हित जपणार, गैरव्यवहार खपवून घेणार नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये आजही गोरगरीब जनतेच्या ठेवी आहेत. मुदत संपल्यानंतर ठेवी परत करणे संस्थांवर बंधनकारक असताना, अनेक ठिकाणी ठेवी मिळत नसल्याच्या तक्रारी लेखी स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. अशा तक्रारींवर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल आणि कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा सुरवसे यांनी दिला. संस्था अत्यंत महत्त्वाची असून, कर्ज घेतल्यानंतर ते फेडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.
सहकार विभागाचे बारकाईने लक्ष
सध्या सहकारी विभागाचे प्रत्येक विविध कार्यकारी सोसायटी, पतसंस्था आणि इतर विविध संस्थांवर बारकाईने लक्ष आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील या संस्थांवर लक्ष ठेवून आहे, असे सुरवसे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहकार संस्थांचा पुढाकार
सहकार संस्थांनी विविध व्यवसाय सुरू केल्यास शेतकऱ्यांचा नक्कीच विकास होईल. सभासदांना देखील अनेक योजना या संस्थांच्या माध्यमातून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वितरण केले जाते. शेतकरी देखील आपल्या शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. प्रत्येकाने कर्ज भरणे हे आपले कर्तव्य समजून, “मी संस्थेचा मालक आहे, संस्था माझी आहे” या भावनेने आर्थिक व्यवहार केल्यास आपली पत वाढेल आणि संस्था प्रगतीपथावर जाईल. शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत असताना, त्या प्रत्येक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक सचिवाचे काम आहे. संस्था पुढे नेण्यासाठी संचालक मंडळ आणि त्या संस्थेचा सचिव हे दोन्ही घटक तेवढेच महत्त्वाचे आहेत, असेही मंगेश सुरवसे यांनी स्पष्ट केले.


