पुण्य वार्ता
नागपूर: नागपूरच्या दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्ताने राज्य सरकारकडे २४ मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनामध्ये “लाडका भाऊ, लाडकी बहीण त्याच प्रमाणे लाडका पत्रकार” या योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संवादा दरम्यान अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली. पत्रकार संघाने राज्य सरकारकडून पत्रकारांसाठी ठोस योजना आणि कल्याणकारी उपायांची अपेक्षा व्यक्त केली आहे.
यावर्षी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने ‘वारकरी जीवनगौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या निमित्ताने राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी विखे पाटील यांच्या समवेत विविध विषयांवर चर्चा केली.
चर्चेदरम्यान पत्रकारांच्या विविध समस्या, त्यांच्या सामाजिक सुरक्षेचे मुद्दे, आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी कायदेशीर व नियामक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. लवकरच या मागण्यांवर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

