पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कर्तव्यदक्ष तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मोरे यांना स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तहसीलदार मोरे यांची प्रशासकीय कार्यक्षमता आणि जनहितकारक निर्णयांचे कौतुक यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.
या सत्कार समारंभाचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईकवाडी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तहसीलदार मोरे यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यात अनेक विकासात्मक योजना आणि शासकीय कार्ये प्रभावीपणे पार पडली आहेत. त्यांच्या या कार्यक्षमततेची दखल घेत पत्रकार संघ व स्थानिक नागरिकांनी त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले होते. सत्कार सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवरांनी तहसीलदार मोरे यांच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी यावेळी बोलताना सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि अकोले तालुक्याच्या विकासासाठी आपले प्रयत्न अविरतपणे सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यास नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी तहसीलदार मोरे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्यकाळात तालुक्याच्या विकासात आणखी भर घालेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
