पुण्य वार्ता
अकोले, दि. ९ : अकोले विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिली जिल्हास्तरीय तपासणी झालेल्या ३०७ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या 368 मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवडणूक निरीक्षक श्री. हौलीनलाल गौईटे (भा.प्र.से) व निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव यांच्या उपस्थिती ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अकोले तहसील येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे, नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. पंकज गोसावी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अकोले विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ३६८ बॅलेट युनिट, ३६८ कंट्रोल युनिट आणि ३९९ व्हीव्हीपॅट यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.
अकोले विधानसभा मतदार संघासाठी मतदान केंद्राच्या १२० टक्के प्रमाणात बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १३० टक्के प्रमाणात व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली आहेत. ही यंत्रे स्ट्रॉग रूममध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. दुसरी सरमिसळ प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीना स्ट्रॉग रूममध्ये घेऊन जाऊन दाखविण्यात आली. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ही यंत्रे मतदानाच्या दृष्टीने तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, असे श्री. यादव यांनी सांगितले.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी २१६ अकोले (अ.ज.) विधानसभा मतदार संघ तथा तहसीलदार, अकोले
निवडणूक निर्णय अधिकारी २१६ अकोले (अ.ज.) विधानसभा मतदार संघ तथा उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) अहिल्यानगर
