पुण्य वार्ता
संगमनेर खुर्द :(संजय गोपाळे )
दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर देखील बिबट्यांनी हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील अशोक नारायण कासार यांच्या गायांच्या गोठ्यातील एक वर्षाच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना काल मध्यरात्री च्या सुमारास घडली आहे. दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढल्याने ग्रामीण भागामध्ये दिवसाढवळ्या देखील बिबट्यांचे दर्शन होत असल्याने प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शाळेत जाणारे लहान मुले, शेतात जाणाऱ्या महिला यांच्या मध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. संगमनेर तालुक्यातील मागील महिन्यात देवगाव येथील 2 महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच संगमनेर खुर्द , परिसरातील हिवरगाव पावसा फाटा ते संगमनेर बायपास रोडवर जखमी बिबट्याला वाचवताना दोन युवकांना देखील बिबट्याने घायाळ केले होते. संपूर्ण संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढल्याने दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे हल्ले सुरूच असून वन विभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.
सदर निमगाव खुर्द येथील, शेतकऱ्याच्या गोठ्यातून बिबट्याने कालवड ठार केली असून, तातडीने वन विभागाला दूरध्वनी द्वारे कळविण्यात आले आहे. वनविभागाने तातडीने या भागांमध्ये बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अशोक कासार यांनी केली आहे.

