पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड)-
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांतिकारी पाऊल असून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना देणारे आहे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे उपयुक्त आहे. त्यामूळे बेरोजगारीवर मात करणे सहज शक्य होईल,असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.संजय ढोले यांनी केले. ते ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने आयोजित केलेल्या एक दिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते.
” नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाच्या कक्षा रुंदावून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आंतरशाखीय ज्ञान प्राप्त करणे सहज शक्य होणार आहे ” असे मत डॉ. ढोले यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की, वर्गातील अध्यापनाबरोबरच अनुभवाधिष्ठित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीमुळे आगामी काळात शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल होऊन नव्या पिढीला चौफेर ज्ञान प्राप्त करता येईल व रोजगाराची समस्या सुटेल ” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
चर्चासत्रासाठी प्रथम वर्षातील प्रवेशित सर्व विद्यार्थी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा . रोहित मुठे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण सातपुते व आभार प्रदर्शन डॉ.रावसाहेब ननावरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.रोहित मुठे, सदस्य डॉ.भरत शेणकर, डॉ. वाल्मिक गिते,विलास लांघी, करण ताठे आदींनी विशेष परिश्रम घेतले.


