पुन्य वार्ता
अकोले, दि. १४ अकोले विधानसभा मतदारसंघात आजपासून गृह मतदानास (होम वोटिंग) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १४९ मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ८५ वर्षांवरील १३३ ज्येष्ठ नागरिक, तर १६ दिव्यांग मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे दिली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षावरील व दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी नमूना १२ ड भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघासाठी गृह मतदानासाठी २५५ मतदारांनी नोंदणी केली आहे. १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान होणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या ११ पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात येणार आहे. गृह मतदानांसाठी टपाली मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार किसन लोहारे, मार्तंड माळवे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. दत्तू वाघ, प्रमोद सावंत गृह मतदान प्रक्रियेवर् लक्ष ठेऊन आहे.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी २१६ अकोले (अ.ज.) विधानसभा मतदार संघ तथा तहसीलदार, अकोले
निवडणूक निर्णय अधिकारी २१६ अकोले (अ.ज.) विधानसभा मतदार संघ तथा उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) अहिल्यानगर
