वीरगाव (ज्ञानेश्वर खुळे)-
आज सकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान सर्वत्र शेतक-यांची आणि दुध उत्पादकांची वर्दळ सुरु असताना बिबट्याने अकोले तालुक्यातील वीरगावात दोघांवर जीवघेणा हल्ला केला तर दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केला.बस्तीराम रामचंद्र गांगड,माधव पोपट देशमुख या दोघांवर बिबट्याने हल्ला करुन या दोघांनाही जबर जखमी केले.संदीप लक्ष्मण वाकचौरे आणि सार्थक संदीप वाकचौरे यांचेवरही बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला.हल्ला करणारी बिबट्याची मादी असल्याने तिचे पिलांसहित शिवारात वास्तव्य आहे.पिले चुकल्याने त्यांचे शोधार्थ मादीने या सर्वांवर हल्ला केला.बिबट्याच्या दहशतीने आता सारे वीरगावकर हादरुन गेले असून दिवसाढवळ्या हल्ले झाल्याने वातावरण चिंताक्रांत बनले आहे.
सकाळीच दुध उत्पादकांची लगबग आणि शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची शेतशिवारात वर्दळ असते.वरील सर्वजण शेतात कामानिमित्त गेले असता बिबट्याने त्यांचेवर हल्ला केला.गावठाण आणि शिवारात भटक्या आणि पाळीव कुत्र्यांची संख्या मोठी होती.बिबट्यांनी हल्ले केल्याने ही संख्या आता नगण्य आहे.अनेकांच्या पशुधनावरही हल्ले सुरुच आहेत.भक्ष्याची विवंचना सुरु झाल्याने बिबट्यांनी आता थेट मानवी वस्तीत प्रवेश केला आहे.अगदी गावठाणात शिरुन अनेक कुत्री आणि पशुधनाचा फडशा पाडला.आता बिबट्यांनी थेट माणसांनाच आव्हान दिले असून हे हल्ले वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.यापुर्वी वनखात्याकडे वेळोवेळी मागणी करुनही पिंजरा लावण्यास अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने आता शेतक-यांमध्ये वनखात्याविरोधात तीव्र रोष आहे.
दरम्यानच्या काळात वनखात्याला ही बातमी कळविली असता वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले.सोबत तीन पिंजरे घेऊन ही कुमक हजर झाली.पिंजरे शिवारात लावले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याने सर्च ऑपरेशन सुरु केले.बिबट्याचे एक पिल्लू बाळासाहेब कडलग यांचे शेतातील गिन्नी गवतात मिळून आले.जखमी झालेले बस्तीराम गांगड यांना प्रथमोपचारानंतर नाशिकला हलविण्यात आले तर माधव देशमुख हे संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
वनखात्याचे वन अधिकारी धिंदळे,वनपाल पंकज देवरे अधिकारी आणि सर्व वन कर्मचारी बिबट्याचा वावर असणा-या परिसरात ठाण मांडून आहेत.भाजपाचे नेते जालिंदर वाकचौरे, नामदेव कुमकर,संदीप आस्वले, विजयसिंह थोरात,आबासाहेब थोरात,प्रकाश वाकचौरे, बाळासाहेब कडलग,सतिष वाकचौरे, सुभाष कुमकर यांचेसहित शिवारातील शेतकरी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यी आणि नागरिकांमध्ये धास्ती
--------------
भर दिवसा बिबट्याने हल्ला केल्याने वीरगावात वातावरण भयग्रस्त आहे.शिवारात एकाहून अधिक बिबटे असण्याची शक्यता असून शाळेत येणारे लहान-सहान विद्यार्थ्यी भयभीत झाले असून पालक आणि शिक्षकही चिंतेत आहेत.शाळेत येताना आणि जाताना पालकांनी शक्यतो काही दिवस पाल्याची सोबत करावी आणि नागरिकांनीही रात्री-अपरात्री फिरताना काळजी घ्यावी असे आवाहन वनखात्याने केले आहे.