पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी– दि.9 ऑक्टोबर रोजी भंडारदरा धरणास आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असा ऐतिहासिक नामकरण सोहळा हजारो आदिवासी नागरिकांच्या उपस्थितीमध्ये व अकोले तालुक्याचे जलनायक तथा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.त्याची जोरदार तयारी भंडारदरा धरणावर चालू असून नामकरण सोहळ्याचे बोर्ड लावण्यात आलेले आहे.
जल संपदा विभाग महाराष्ट्र शासन
शासन निर्णय क्र. व्हीआयपी/२०२२/प्र. क्र.२७०/२०२२/सिंव्य(महसूल)दि.४ सप्टेंबर २०२४ अन्वये या नामकरणास मंजुरी देण्यात आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना या नामकरण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते.मात्र ना. देवेंद्र फडणवीस माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना सांगितले की, या नामकरणास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली असून या नामकरण करण्याचे श्रेय फक्त तुमचेच असून तुम्हीच आम्हामध्ये सर्वात जेष्ठ आहात. त्यामुळे तुमच्याच हस्ते नामकरण सोहळा करावा असे सांगितले.
त्यानुसार आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय नामकरण सोहळा बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी भंडारदरा येथे होणार असल्याची माहिती माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिली.
शनिवारी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अभियंता अभिजित देशमुख,इतर अधिकारी, आदिवासी समाजाचे नेते दगडू पांढरे पा., भरत घाणे,अनंत घाणे, पांडुरंग खाडे, गंगाराम इदे, सोमा रोंगटे, बच्चू गांगड, बाजीराव सगभोर,दत्ता ढगे,तुकाराम खाडे, सुनील सारुक्ते,सुरेश गभाले,अशोक घोलवड ,संतोष सोडनर,इतर कार्यकर्ते यांच्या समवेत जागेची पाहणी केली. भव्य दिव्य मंडप टाकण्याचे नियोजन केलेले आहे.
तरी या ऐतिहासिक नामकरण सोहळ्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले आहे.
