पुन्य वार्ता
अकोले : निवडणूक विषयक सर्व प्रकिया पार पडताना कोणतीही चूक होऊ नये, यासाठी अकोले तालुक्यात सुमारे २०४० अधिकारी,कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी दिली.
दिवसभरातील दोन सत्रात २०४० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण सकाळ व दुपार असा सत्रात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी प्राधान्याने करावयाच्या अनिवार्य बाबी, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, मतदान यंत्रे हाताळणीबाबत असलेल्या तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडत असताना सर्व यंत्रे सुरळीतपणे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, मतदान प्रकिया सुरु होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष मतदानाआधी अभिरूप मतदान घेणे. अभिरूप मतदान प्रकियेच्या सुरुवातीपासून ते प्रकिया संपन्न होईपर्यंतची सविस्तर माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली. २०४० विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी सहभागी झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी या सर्व अधिकारी,कर्मचारी यांना विविध विषयांचे प्रशिक्षण दिले आहे. यावेळी निवासी नायब तहसीलदार श्री. किसान लोहारे, महसूल नायब तहसीलदार श्री. प्रमोद सावंत, निवडणूक नायब तहसीलदार दत्तू वाघ, नायब तहसीलदार मार्तंड माळवे तसेच इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेत मतदान हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. हा टप्पा अधिक बिनचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेतील विविध घटकांना या प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व बिनचूक पार पाडण्यासाठी फायदा होईल – निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव.

