पुण्य वार्ता
अहमदनगर संगमनेर अकोले विधानसभा मतदारसंघातील भुमिपुत्र तथा सातारा जिल्ह्यातील
वाई येथील दिशा जुनियर कॉलेजचा विद्यार्थी सुयश साईनाथ वाळेकर याची पुणे येथील नामांकित बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) मधून सुयशने पहिल्या फेरीतूनच आपला प्रवेश निश्चित केला आहे. सुयशने नीट परीक्षेत तब्बल 575 गुण मिळवले असून, यामुळे त्याला बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे.
सुयशने आपल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत देखील उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याला 94 टक्के गुण मिळाले होते, जे त्याच्या कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनाचे फलित आहे. दिशा जुनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना सुयशने अभ्यासाचे वेळापत्रक तयार केले होते आणि त्यानुसार विषयानुसार अभ्यास केला होता.
सुयशच्या यशस्वी प्रवासात त्याला दिशा जुनियर कॉलेजचे संस्थापक नितीन कदम सर, मार्गदर्शक शिक्षक श्री शर्मा सर, दुबेसर, अभिषेक सर यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. त्याचप्रमाणे, सुयशच्या यशात त्याच्या कुटुंबाचेही मोठे योगदान आहे. त्याची आई सौ. मीनाक्षी वाळेकर या वाईतील नगरपालिका शाळा क्रमांक 4 मधील मुख्याध्यापिका आहेत, तर वडील श्री. साईनाथ वाळेकर हे पंचायत समिती वाईचे गटशिक्षणाधिकारी आहेत.
सुयशला बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. समाजातील विविध व्यक्तींनी त्याच्या या यशस्वी प्रवासाबद्दल अभिनंदन केले आहे. सुयशचा हा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.त्याच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस डॉ विश्वास आरोटे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अनिल रहाणे मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख कुंडलिक वाळेकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे तालुका अध्यक्ष अशोक उगले यांनी अभिनंदन केले आहे.

