पुण्य वार्ता
विरगाव(ज्ञानेश्वर खुळे)--
वीरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांना सर फाउंडेशनच्या वतीने 'सर सन्मान' देऊन सन्मानित करण्यात आले.
सोलापूर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ‘सारथी‘चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या हस्ते चासकर यांच्यासह सहा मान्यवरांना हा सन्मान समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ‘सकाळ‘चे संपादक अभय दिवाणजी, पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत कार्यरत शास्त्रज्ञ डॉ. आशिष भट्टाचार्य, सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, ‘बालभारती‘चे माजी विशेषाधिकारी डॉ. अजय लोळगे, बीड जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ, ‘एससीइआरटी‘चे योगेश सोनवणे, सर फाउंडेशनचे समन्वयक बाळासाहेब वाघ, सिद्धराम माशाळे आणि हेमा वाघ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चासकर यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय असून, माईंड मॅपसारखे त्यांचे उपक्रम राज्यातील तसेच गुजरात तसेच कर्नाटकमधील शिक्षकांच्या दृष्टीने अनुकरणीय ठरले आहेत. ॲक्टिव्ह टीचर्स फोरम(महाराष्ट्र) या गटाचे चासकर संयोजक आहेत. अकोले तालुक्यात ‘आपली शाळा मराठी शाळा’ ही प्रचार मोहीम राबवण्यामध्ये चासकर यांचा पुढाकार राहिला आहे. विविध वृत्तपत्रांमधून तसेच आकाशवाणीसाठी चासकर यांनी विपुल लेखन केले आहे. विविध वाहिन्यांवरील चर्चेत त्यांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समिती, राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने गठित केलेल्या विचार गटाचे सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा सदस्य म्हणून काम केले आहे. सर फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा सर सन्मान मिळाल्याबद्दल चासकर यांचे अभिनंदन केले जात आहे.

