पुन्य वार्ता
गणोरे,प्रतिनिधी:*
राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेच्या 12 व्या शाखेचे उद्घाटन गणोरे येथे होणार असून हा सोहळा 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दानशूर ज्येष्ठ समाजभूषण नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला आणि परमपूज्य योगी केशव बाबा चौधरी यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. याबाबतची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुबंरे यांनी दिली.
माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच आपल्या उत्कृष्ट कारभारामुळे संपूर्ण राज्यात सभासद वर्गामध्ये विश्वास आणि गुणवत्ता निर्माण केली आहे. संस्थेने ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब व्यावसायिक यांच्यासाठी विशेष योगदान दिले असून त्यांना आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण केले आहे. या संस्थेच्या कार्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला महत्त्वाची चालना मिळाली आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत महाराज डुबंरे हे सरकारी सेवेत प्रांताधिकारी म्हणून काम करत असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जवळून जाणून घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पतसंस्था चळवळीत योगदान देत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राबवले आहेत. संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि इतर शाखा माजीवाडा, मनोरमा नगर, कल्याण, घाटकोपर, कोपरखैरणे, नंबर वाडी, आळेफाटा, बनकर फाटा, मड, पारगाव, नारायणगाव आणि कारखाना फाटा येथे कार्यरत आहेत. आता देवठाण येथे सुरू होणारी ही शाखा परिसरातील गणोरे या बाजारपेठेतील नागरिकांना तसेच पंचक्रोशीतील शेतकरी, ठेवीदार व कर्जदारांना आर्थिक सुविधा पुरवण्यासाठी महत्त्वाची ठरेल.
या उद्घाटन सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवठाण व परिसरातील नागरिकांना पतसंस्थेच्या सेवांचा लाभ मिळणार आहे. देवठाण शाखेचे उद्योजक श्रीकांत सहाने यांनी सांगितले की, “या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.”
उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सर्व मान्यवर व नागरिकांना निमंत्रण देण्यात येत असून, या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरातून सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

