पुन्य वार्ता
अहिल्यानंगर (प्रतिनिधी) राधाकृष्ण हे प्रेम व भक्तीचे मूर्तिमंत स्वरूप असून सर्वांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले आहे. जेव्हा आपण श्रीकृष्णाची शक्ती व सृष्टिरूप अविष्कार म्हणून राधे कडे पाहतो तेव्हा ती दैवी स्वरुपात आपल्याला दिसते तर लौकिक अर्थाने जेव्हा आपण राधेकडे पाहतो तेव्हा ती सामान्य स्त्री म्हणूनच आपल्या भासते. पण आजपर्यंत राधा केवळ शृंगार रसाच्या गवळणीतूनच आपल्या समोर मंडली गेली. मात्र राधेचे आध्यात्मिक भक्तीस्वरूपा कार्य हे शृंगारा पेक्षाही किती मोठे आहे हे ‘राधा’ या कादंबरीतून आपल्या कळते. राधेच्या जीवनावर मराठीतील पहिलीच कादंबरी लिहिताना प्रा.डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांनी राधेचे दैवी व लौकिक रूप या दोन्हीही बाजू लालित्यपूर्णतेने मांडून आव्हानात्मक व अतिशय परिणामकरक लिखाण केले आहे. राधाकृष्णाच्या लीला, रासक्रीडा ते राधेचा शेवट या कादंबरीत असल्याने ही कादंबरी वाचताना आपण कृष्णमय व राधामय होऊन जातो, असे प्रतिपादन पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित यांनी केले.
अहिल्यानगरचे संत व लोक साहित्याचे अभ्यासक लेखक प्रा.डॉ.अनिल सहस्रबुद्धे लिखित ‘राधा’ या पौराणिक कादंबरीचे प्रकाशन नुकतेच पुणे येथे झालेल्या ग्रंथोत्सव मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या काही निवडक ग्रंथ व कादंबऱ्यां बरोबर झाले. त्यानंतर अहिल्यानगर येथे आनंद विद्यालयातील श्री ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गात ‘राधा’ कादंबरीचे पुनर्प्रकाशन तथा स्वागत पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित यांच्या सह स्त्री शक्तीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आनंद एज्युकेशन सोसायटीचे सचिव किसनराव तरटे, आनंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा पोखरकर, डॉ. दिलीप धनेश्वर, लेखक प्रा.डॉ.अनिल सहस्रबुद्धे आदींसह ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाचे अभ्यासक उपस्थित होते.
किसनराव तरटे म्हणाले, अध्यात्मा शिवाय पर्याय नाही हे भारताने सर्व जगाला दाखवून दिले आहे. डॉ.अनिल सहस्रबुद्धे यांनी या वयातही लेखनाच्या माध्यमातून केलेली अध्यात्माची सेवा व लेखन कौतुकास्पद आहे. डॉ. दिलीप धनेश्वर यांनी श्री ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाची सविस्तर माहिती दिली.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर स्वर्णमहोत्सवी जयंती महापर्व व वाचन संस्कृती संवर्धन चळवळी अंतर्गत श्री ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गाच्या वतीने आनंद विद्यालयास कृतज्ञतापूर्वक विविध ग्रंथांची भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीनाक्षी मालुंजकर यांनी केले. प्रा.ऋता ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले तर उषा सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.
यावेळी स्वाती ननावरे, सीमा सोले, सुजाता नरसाळे, इंदु खेडकर, सौ.महापुरुष, प्रा. डॉ.राजू रिक्कल, प्रा.डॉ.मच्छिंद्र मालुंजकर, प्रा.सुदाम देवखिळे आदी ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गातील सर्व अभ्यासक उपस्थित होते. यावेळी वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी सर्वांनी प्रा.डॉ.अनिल सहस्रबुद्धे लिखित राधा, अगस्त्य व नारद या कादंबऱ्या विकत घेऊन प्रतिसाद दिला.
