पुण्य वार्ता
संगमनेर खुर्द :
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील सेंट्रल बँकेच्या शाखेचे शटर तोडून चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला, असून सेंट्रल लॉक न तुटल्यामुळे चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी धूम ठोकल्याची घटना घडली आहे.
दि. 9 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या एक ते दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी पेमगिरी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया पेमगिरी शाखेच्या शटर चे दोन्ही लॉक तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरट्यांना सेंट्रल लॉक न तुटल्यामुळे चोरट्यांनी चोरी न करताच धूम ठोकली.
सकाळी गावातील दूध घालणाऱ्या ग्रामस्थांना सेंट्रल बँकेचे शटर तुटल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. तसेच बँकेचे शाखा अधिकारी ऋषिकेश लांबे यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती देण्यात आली. सदर घटनेची खबर कळताच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस , उप निरीक्षक सातपुते, पो.शिरसाट, हे. कॉ. महाजन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला. व अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच घटनेची खबर कळतात सेंट्रल बँकेचे मुख्य शाखाधिकारी ऋषिकेश लांबे व त्यांचे सर्व कर्मचारी, व अहिल्यानगर जिल्हा दक्ष अधिकारी संदीप बिरादार यांनी देखील घटनास्थळी धाव घेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले.

