पुन्य वार्ता
पारनेर (प्रतिनिधी): घरात पाणी शिरल्याने मोठ्या नुकसानाला सामोरे गेलेल्या निघोज येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार संपतराव वैरागर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने किराणा माल व आवश्यक वस्तूंचे वितरण करून माणुसकीची साथ देण्यात आली.
दि. १९ रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांनी थेट वैरागर यांच्या निघोज येथील घरकुलात भेट देऊन मदतीचा हात पुढे केला. काही दिवसांपूर्वी जोरदार पावसामुळे त्यांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात साहित्याचे नुकसान झाले होते. ही माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांनी तत्काळ पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांना याबाबत माहिती दिली.
आज पत्रकार वैरागर यांना प्रत्यक्ष भेटून डॉ. विश्वासराव आरोटे व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर संजय फुलसुंदर यांनी किराणा माल व इतर जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या. यावेळी पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने आवश्यक उपाययोजना केली जाणार असल्याचे आश्वासनही आरोटे यांनी दिले.
पत्रकाराच्या दुःखात सहभागी होऊन दिलासा देण्याचे हे उदाहरण समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा हा उपक्रम खर्या अर्थाने ‘पत्रकार हित’ जोपासणारा आहे.
