पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- राजूर येथील कावीळ झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतिने 15000 /-रुपये किमतीच्या लिव्हर टॉनिक च्या 100 औषधी बाटल्या देत रोटरी क्लब ने आपली आपत्तीत लोकांच्या मदतीला जायची परंपरा कायम ठेवली.गट विकास अधिकारी अमर माने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शामकांत शेटे यांच्याकडे या बाटल्या सुपूर्त करण्यात आल्या.
राजूर येथे मध्यंतरी काविळीची मोठी साथ आली होती.या साथीत अनेक नागरिकाना काविळीची बाधा झाली. दुर्दैवाने यात दोन मुलींचे निधन झाले.काविळीच्या आजारात माणसाच्या लिव्हर वर परिणाम होत असतो.साथीची गंभीर परिस्थिती व अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या वतीने काविळीच्या आजाराने रुग्ण झालेल्या व्यक्तीसाठी औषधोपचार करण्यासाठी 15000/-रुपये किंमतीची लिव्हरटॉनिक औषधांच्या 100 बाटल्या मदत म्हणून देण्याचा निर्णय रोटरी क्लब ने घेतला व त्याची तातडीने कार्यवाहीही केली. यासाठी सर्व सदस्यांनी आपले आर्थिक योगदान दिले.या 100 औषधांच्या बाटल्या गट विकास अधिकारी अमर माने,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शामकांत शेटे यांच्या कडे सुपूर्त करून आपला खारीचा वाटा उचलला.यावेळी रोटरी क्लब अकोले सेन्ट्रलचे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, सेक्रेटरी अमोल देशमुख, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, माजी अध्यक्ष सचिन देशमुख, सचिन आवारी, डॉ.रवींद्र डावरे, माजी उपाध्यक्ष डॉ.जयसिंग कानवडे,माजी खजिनदार रोहिदास जाधव,सदस्य प्राचार्य संतोष कचरे, विजय पावसे,हेमंत मोरे,भारत पिंगळे आदीसह आरोग्य विभागाचे डॉ.शेळके,श्री येलमामे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
अकोले रोटरी क्लब हा नेहमी सामाजिक,शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात पुढाकार घेऊन कार्यरत असल्याने त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
चौकट- रोटरी क्लब च्या वतीने अकोले तालुक्यात पंचायत समिती चे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्त झालेले अमर माने यांचे अकोले तालुक्यात स्वागत करून त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर रोटरी क्लब चे सदस्य हेमंत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त गट विकास अधिकारी अमर माने आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शामकांत शेटे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

