पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी) – मॉडर्न हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, अकोले येथील विद्यार्थी सिद्धेश राजेंद्र नवले याने बारावीच्या वाणिज्य शाखेच्या बोर्ड परीक्षेत 87.83 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
तालुक्यातील तांभोळ गावचा रहिवासी असलेल्या सिद्धेशने आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे यश संपादन केले आहे. ‘ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कमी असते’ या गैरसमजाला फाटा देत सिद्धेशने आपल्या ज्ञानाची आणि अभ्यासाच्या वृत्तीची ठोस छाप सोडली आहे.
सिद्धेश हा अगस्ती पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष ह.भ.प. राजेंद्र महाराज नवले यांचा चिरंजीव आहे. त्याच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका अध्यक्ष अशोकराव उगले तसेच वारकरी संप्रदायाच्या वतीने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
सिद्धेशने पुढील शिक्षणासाठी चाटर्ड अकाउंटंट (C.A.) हे क्षेत्र निवडले असून, त्या दिशेने निश्चित आणि ध्येयविवश वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

