पुन्य वार्ता
ठाणे | प्रतिनिधी
दि. २१ जून २०२५ रोजी माळशेज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, ठाणे येथील नवीन मिटींग सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून समाजरत्न डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला) उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते या नवीन सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. चंद्रकांत महाराज डुंबरे होते. यावेळी सौ. नयना डुंबरे, श्री. नाना महाराज देशमुख, श्रीमती देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना नानजीभाई ठक्कर यांनी संस्थेच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, “संस्था अनेक वर्षांपासून समाजकार्यासाठी कार्यरत असून आज नव्या मिटींग सभागृहाचे उद्घाटन हे संस्थेच्या प्रगतीचे लक्षण आहे.” त्यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र राहून चांगल्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. “कर्म करत राहा, देव सर्व काही देईल. सुशिक्षित व निर्व्यसनी समाज हेच आपले ध्येय असावे,” असेही त्यांनी सांगितले.
ह.भ.प. चंद्रकांत डुंबरे यांनी आपले विचार मांडताना म्हटले की, “संस्थेच्या प्रत्येक शाखेवर नानजीभाई यांचा आशीर्वाद कायम लाभत असतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
सौ. नयना डुंबरे यांनीही नानजीभाई यांचा सामाजिक व धार्मिक कार्यातील सहभाग अधोरेखित केला. “ते कोणतेही कार्य असो, तत्परतेने समाजासाठी वेळ देतात,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी नानजीभाई ठक्कर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिक व संस्था सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

