पुण्य वार्ता
अकोले/राजूर (प्रतिनिधी)
सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड्. मनोहरराव नानासाहेब देशमुख यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या कृतार्थ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी राजूर येथील ॲड्. एम.एन. देशमुख महाविद्यालयात संपन्न होत आहे.आमदार डॉ. किरण लहामटे , मुंबई येथील शिक्षणतज्ज्ञ,उद्योजक महेश राघू शेट्टी तसेच शिक्षणतज्ज्ञ व उद्योजक डॉ. श्रेणीक कोटेचा यांच्या शुभहस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार असून ज्येष्ठ विचारवंत , वक्ते एस. झेड्. देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड व डॉ. सुधीर तांबे, सत्यनिकेतन संस्थेचे कोषाध्यक्ष विवेकजी मदन,सचिव एम. एल. मुठे, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले,जिल्हा बँक संचालक अमितजी भांगरे ,अगस्ति देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष के.डी. धुमाळ ,सामाजिक कार्यकर्ते सुरेशजी कोते यांचे सह सामाजिक ,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष असणाऱ्या ॲड्. देशमुख यांचे सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान आहे. प्रेम , ज्ञान आणि बळ या तिन्ही गोष्टी ज्यांच्याजवळ आहे, त्याला जगात कृतार्थ होता येईल, असे व्यक्तिमत्त्व ॲड्. मनोहरराव नानासाहेब देशमुख यांचे आहे. निष्णात कायदे पंडित,आरोग्य साधनेवर भर देणारे योगसाधक , ग्रामीण व आदिवासी भागाच्या उन्नतीसाठी झटणारे विधायक वृत्तीचे कार्यकर्ते, तत्त्वनिष्ठ शिक्षणप्रेमी व जनसेवेतच ईश्वरसेवा अनुभवणारे पारमार्थिक आणि अनेकविध संस्थांचे संगोपन अशा अनेक नात्यांनी ग्रामीण व आदिवासी भागांपासून मुंबईसारख्या अफाट नगरीपर्यंत ॲड्. मनोहरराव देशमुख यांनी जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे. राजूर येथील ॲड्. एम.एन. देशमुख महाविद्यालयाच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत विविध संस्थांच्या वतीने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. सामाजिक कार्याचा वसा घेणाऱ्या एका विधी तज्ज्ञाचा पट मांडणारा कृतार्थ हा ग्रंथ आहे.
ॲड्. एम.एन. देशमुख महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. द.के. गंधारे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. या ग्रंथात ॲड्. एम.एन. देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे मान्यवरांनी तसेच त्यांच्या आप्तस्वकीयांनी लिहिलेले लेख समाविष्ट आहेत. अकोले येथील प्रख्यात चित्रकार मिनानाथ खराटे यांनी या ग्रंथाचे मुखपृष्ठ तयार केले आहे.
या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रण समितीच्या वतीने समितीचे प्रमुख माजी प्राचार्य विलास नवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. वाय. देशमुख, संस्थेचे संचालक प्रकाश टाकळकर ,प्राचार्य बादशहा ताजणे , संपादक डॉ.द. के. गंधारे ,प्रकाशक दीपक पाचपुते,पत्रकार प्रकाश महाले आदींनी केले आहे.

