पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी-
अकोले तालुक्यासह उत्तर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या निर्मिती मध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे सर्वात मोठे योगदान असून त्यांनी या धरणासाठी आपली सर्व राजकीय कारकिर्द या साठी खर्च करून अकोलेसह अनेक तालुक्यांचा पाणी प्रश्न सोडविलेला आहे.त्यामुळे या निळवंडे धरणास जलनायक मधुकररावजी पिचड साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी निळवंडे धरणग्रस्त कृती समितीचे सचिव तथा भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे यांनी केली आहे.
आज भाजप पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजप तालुका सरचिटणीस राहूल देशमुख, उपाध्यक्ष सोमनाथ पवार,अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सुधाकर देशमुख, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,तालुका सरचिटणीस मच्छीन्द्र मंडलिक,राजेंद्र डावरे,खंडू बाबा वाकचौरे,आनंदराव वाकचौरे, अशोकराव आवारी, प्रतीक वाकचौरे,,विवेक चौधरी,दगडू हासे,बाळासाहेब सावंत,रमेश राक्षे,रोहिदास वाल्हेकर,महेश काळे, आदीसह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
यावेळी यशवंतराव आभाळे पुढे म्हणाले की, अकोले तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले निळवंडे धरण हे अकोले तालुक्यातील एक महत्वपूर्ण धरण आहे.या निळवंडे धरणाच्या निर्मितीला 50 पेक्षा जास्त वर्षाचा इतिहास आहे.या निळवंडे धरणाची जागा निश्चित करण्यापासून निळवंडे धरण निर्मिती होइपर्यंत अनेक अडथळे,अडचणी निर्माण होऊन सुद्धा हे धरण एक राज्याला नव्हेतर देशाला दिशा देणारे आदर्श धरण म्हणून ओळखले जाते.आणि दुसरी बाजू म्हणजे आधी पुनर्वसन मग धरण असे धोरण घेऊन निर्मिती झालेले हे धरण आदर्श पुनर्वसन झालेले धरण होय.आशिया खंडात एकाच धरणाला चार कालवे असलेले हे एकमेव धरण असून या धरणाला पिचड पॅटर्न म्हणून ओळखले जाते .कारण या धरणाच्या निर्मिती मध्ये सर्वात मोठे योगदान,पाठपुरावा करण्यात माजी मंत्री मधूकररावजी पिचड साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे.
या धरणामुळे अकोले सह संगमनेर/ राहाता तालुक्यातील अनेक वर्षे तहानलेली गावे पाण्याखाली आली असून ही गावे आता बागायती होतांना दिसत आहे.आज या निळवंडे धरणावर वीज निर्मिती प्रकल्प चालू आहे. धरणग्रस्तांचें योग्य पुनर्वसन करण्यात आलेले आहे. धरणग्रस्तांच्या/ प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शासकीय,निमशासकीय, सहकारी क्षेत्रात नोकऱ्या मिळवून दिलेल्या आहेत.धरणाच्या वरील बाजूस उंचावर असलेल्या शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावे म्हणून उच्च स्तरीय कालवे काढून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडला आहे.धरण कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांना पाणी मिळाल्याने जिरायती क्षेत्र ओलिताखाली येवुन बागायती होवू पहात आहे. या धरण निर्मिती मुळे अनेक गावे पुलांच्या साखळी मुळे जोडली गेली आहे.पर्यायाने वाहतूक व्यवस्था सुरळीत, जलदगतीने झाली आहे.पिंपरकने पूल हा 15 गावांना जोडणारा असून सर्वात उंच व लांब असलेला पूल म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री पिचड साहेब यांनी प्रत्येक धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दर आठवड्याला अधिकारी व संबधीत विभागाशी मिटिंग घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. संपूर्ण राजकीय कारकिर्द या धरणासाठी घालवून हे निळवंडे धरण निर्माण करण्यात माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब यांचे मोलाचे योगदान आहे. या धरणाचे देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र भाई मोदी यांनी उदघाटन केले तसेच राज्याचे मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री, पालक मंत्री या प्रसंगी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेले आहेत.याचे सारखे भाग्य कोणत्याही मंत्री महोदयाला मिळालेले नाही ते भाग्य वंदनीय पिचड साहेब यांना मिळाले आहे.
निळवंडे धरणाचे खरे शिल्पकार वंदनीय पिचड साहेब असल्याने या धरणाला वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी तालुक्यातील नव्हेतर संपुर्ण जिल्ह्यातील
लाभधारक शेतकरी यांची इच्छा आहे.
तरी या निळवंडे धरणास पिचड साहेब यांचे नाव देण्यात अशी मागणी सर्व धरणग्रस्त आणि लाभार्थी यांच्या वतीने निळवंडे धरणग्रस्त कृती समिती व अकोले तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने यशवंतराव आभाळे यांनी यावेळी केली.व त्या आशयाचे विनंती पत्र मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांना वपाठविले असल्याची माहिती त्यांनी दिली.

