पुन्य वार्ता
नवी मुंबई:
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि दैनिक महावृत्तचे सहसंपादक, निर्भीड पत्रकार, बौद्धाचार्य तसेच विशाल जनकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव हनवते यांच्या सुवर्णमहोत्सवी (५० व्या) वाढदिवसानिमित्त आयोजित “स्वाभिमानी संकल्प डे” हा भव्य अभिष्टचिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला, या कार्यक्रमाला संबोधित करताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले की,
आज या ‘स्वाभिमानी संकल्प डे’ निमित्त आपण सर्वजण येथे एकत्र आलो आहोत, हे केवळ एक वाढदिवस साजरा करणं नाही, तर हे एका संघर्षशील पत्रकाराच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करण्याचं, अभिवादन करण्याचं एक ऐतिहासिक औचित्य आहे.
जेव्हा मला सांगण्यात आलं की हनवते सरांचा सुवर्णमहोत्सव वाढदिवस आहे, तेव्हा मनात सहज एक विचार आला — यांच्यासारख्या लढवय्या पत्रकाराच्या पाठीमागे एक समर्थ स्त्रीही असली पाहिजे. इथे आल्यावर समजलं की त्यांच्या अर्धांगिनी यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्याबद्दल मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक कणखर स्त्री असते, हे वाक्य खरे करून दाखवणाऱ्या त्या माऊलींचे योगदान आपण विसरू शकत नाही.
आजच्या या मंचावर उभं राहून मी फक्त शुभेच्छा द्यायला आलो नाही, तर काही खंबीर विचार मांडायला आलो आहे. पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही – ती एक जबाबदारी आहे, एक मूल्यप्रणाली आहे. आपण बातमी लिहतो तेव्हा ती एक दिवसच असते, पण त्याचे पडसाद वर्षानुवर्षे उमटत राहतात.
मी अनेक वेळा सांगतो की पत्रकारिता ही समाज बदलण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. याच पत्रकारितेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र सुरू केले, लोकमान्य टिळक यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ सुरू केले. त्यांनी माध्यमं सुरू केली होती – सत्ताधाऱ्यांची स्तुती करण्यासाठी नव्हे, तर शोषितांची, वंचितांची आणि अन्यायग्रस्तांची बाजू मांडण्यासाठी.
त्या काळी वृत्तपत्रांची किंमत होती दीड आना… आणि इंग्रजांच्या हाताखाली काम करणाऱ्यांचा महिन्याला पगार होता फक्त दीड आना. आजच्या काळात पगार लाखो रुपये झालेत, पण वृत्तपत्र अजूनही चार रुपयांत मिळते. विचार करा – माहितीचा, जनजागृतीचा आणि जनतेच्या आवाजाचा हा स्त्रोत अजूनही स्वस्त आहे, पण त्याची किंमत आपण विसरत चाललो आहोत. सोशल मिडियाचा उद्रेक झाला असला तरी पारदर्शकतेसाठी, तळागाळातील आवाज पोहोचवण्यासाठी वृत्तपत्रांची गरज अजूनही तितकीच तीव्र आहे.
आजच्या पत्रकारितेच्या संदर्भात मी एक गोष्ट नेहमी सांगतो – आपण एखाद्याविरोधात बातमी लावतो, आपण विसरून जातो… पण ज्याच्याविरोधात बातमी असते, तो माणूस ती गोष्ट आयुष्यभर विसरत नाही. त्यामुळे पत्रकारांनी आपली लेखणी अत्यंत जबाबदारीने चालवायला हवी. ही लेखणी म्हणजे तलवार आहे – पण ही तलवार अन्यायविरुद्ध असावी, सूडासाठी नव्हे.
मी स्वतः मराठा समाजातला असलो तरी माझ्या संघटनेत ३६ जिल्ह्यांपैकी १४ जिल्ह्यांचे अध्यक्ष बहुजन समाजातून निवडलेले आहेत. हेच सामाजिक न्याय, समतेची जाणीव आणि सर्वसमावेशक नेतृत्व हेच खरे नेतृत्व असते. जेव्हा कुणावर अन्याय होतो, तेव्हा पहिल्यांदा आठवतो तो पत्रकार! पोलिस नाही, वकील नाही – पत्रकार आठवतो. कारण हा एकमेव असा घटक आहे जो तक्रारीपेक्षा तक्रारीचा आवाज बनतो.
कल्याणराव हनवते सरांचा आज जो गौरव होत आहे, तो त्यांच्या लेखणीचा आणि धाडसी विचारांचा गौरव आहे. त्यांनी केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर समाजाला विचार दिला, दिशा दिली. त्यांच्या मुलानेदेखील आज विशाल जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्याची धुरा उचलली आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो.
माझ्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने हनवते सरांना आणि त्यांच्या कुटुंबाला मन:पूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही असाच समाजासाठी आवाज उचलत रहा, लेखणीशी बांधिलकी ठेवत रहा, आणि भविष्यातला एक नवा स्वाभिमानी भारत घडवत राहा.
जय भीम! जय संविधान! जय पत्रकारिता!
धन्यवाद!”


