पुन्य वार्ता
अकोले:
गुरु ही संकल्पना केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण जीवन घडविणारी असते. आपल्या आयुष्यात ज्यांनी ज्ञान, संस्कार, मूल्य, विचार व दिशा दिली, अशा सर्व गुरूंना वंदन करण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पावन पर्वानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि ज्येष्ठ संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी एक हृदयस्पर्शी, अर्थवाही आणि प्रेरणादायी शुभेच्छा संदेश दिला आहे.
डॉ. आरोटे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले,
“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे… कारण या आयुष्यात जो काही मी आहे, ते माझ्या गुरुजनांमुळेच.
आई-वडील हे जीवनाचे पहिले गुरु असतात. त्यानंतर शिक्षण, समाजकारण, पत्रकारिता यामध्ये विविध टप्प्यांवर अनेक गुरूंनी माझं मन, विचार, मूल्य आणि आत्मविश्वास घडवला.”
ते पुढे म्हणतात,
“गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा शिक्षक नव्हे, तर प्रत्येक अडचणीत, संधीच्या क्षणी, वळणावर, संकटात, आणि विचारांच्या संघर्षात जो दिशा दाखवतो तो खरा गुरु असतो. त्यांनी फक्त शिकवलेच नाही, तर ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हेही आत्मविश्वासाने सांगितले. अशा सर्व गुरूंना माझे नम्र वंदन!”
डॉ. विश्वासराव आरोटे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक वैचारिक हाक दिली आहे!
“आजच्या या दिवसावरून आपण सर्वांनी निश्चय करायला हवा की, सत्ता, संपत्ती किंवा प्रसिद्धीपेक्षा आपल्या आयुष्यात सोन्यासारखी माणसे जपायला हवीत. कारण जीवनात कधी नातेसंबंध, कधी माणुसकी, तर कधी एकच सल्ला – आपल्याला अंधारातून बाहेर काढतो. अशा गुरूंनी दिलेली शिकवण हीच शिदोरी आहे.”
ते पुढे नमूद करतात,
“ज्ञान, विवेक, संयम, व्यवहार, आत्मविश्वास, धैर्य, त्याग, निष्ठा आणि माणुसकी – ही सर्व जीवनमूल्ये मला गुरुजनांनी दिलेली देणगी आहे. ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे व्रत मी घेतले आहे.”
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।
या मंत्राच्या उच्चाराने डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सर्व गुरुजनांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
गुरुचरणी वंदन, जीवनात प्रकाश मिळो हीच प्रार्थना!

