पुण्य वार्ता
अकोले:
वरसुआई प्रवरा परिसरातील प्रसिद्ध व श्रद्धास्थान असलेल्या वरसुआई मातेच्या वार्षिक यात्रोत्सवाला यंदा हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. पारंपरिक धार्मिक उत्सवाच्या रंगात रंगलेली ही यात्रा यंदा विशेष ठरली ती “बारा गावच्या बारा अप्सरा” या नावाजलेल्या आर्केस्ट्रा कार्यक्रमामुळे. संपूर्ण गाव, पंचक्रोशी व तालुक्यातील भाविकांनी मोठ्या उत्साहात व शांततेत हा उत्सव साजरा केला.
मराठी गाण्यांनी सजला यात्रा रंगमंच:
शैलेश लोखंडे निर्मित बारा गावच्या बारा अप्सरा या कार्यक्रमात नामांकित महिला कलाकार – सायली केळकर, माया पुणेकर, साधना पुणेकर, शिवानी-सायली पाटील, वैष्णवी मुंबईकर यांनी आपल्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर थिरकवून टाकला. ‘पाटलांचा बैलगाडा’, ‘ही दोस्ती तुटायची नाय’, अशा गाण्यांवर तरुणाईने मनसोक्त नाच करत उत्सवात रंग भरले. कार्यक्रमादरम्यान कोणतीही अशोभनीय शेरोशायरी न करता पारंपरिक मराठी गाण्यांद्वारे महिलांसाठी व ग्रामीण संस्कृतीसाठी आदर्श असा कार्यक्रम सादर करण्यात आला.
धार्मिक विधी व सांस्कृतिक उत्सवांची रेलचेल:
यात्रोत्सवात देवीच्या काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगांच्या निनादात देवीची पालखी गावात फिरवण्यात आली. जागरण-गोंधळ, महाआरती, भजन, कीर्तन, तसेच अश्वमेध यांची भव्य तालीम यावेळी पाहावयास मिळाली. उत्सवाच्या निमित्ताने गावात मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसर, मुख्य रस्ते व चौक विद्युत रोषणाईने उजळून निघाले.
गावकऱ्यांचा एकसंघ सहभाग:
या यात्रेच्या आयोजनासाठी वरसुआई देवस्थान, मित्र मंडळ, जेष्ठ नागरिक, तसेच गावातील युवकांनी कंबर कसून काम केले. विशेष म्हणजे, नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असलेले जुने मित्र, वर्गमित्र, नातेवाईक हेही यात्रेच्या निमित्ताने गावात दाखल झाले. शेवटच्या गाण्यावर सर्वजण एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत ताल धरत होते – “ही दोस्ती तुटायची नाय” हे गाणं त्यांच्या भावना व्यक्त करत होतं.

महिलांचा देखील मोठा सहभाग:
यात्रोत्सवात महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. माहेरवाशिणींनी, भगिनींनी, आणि गावातील महिलांनी पारंपरिक वेशात देवीचे दर्शन घेतले. त्यांच्यासाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यात्रा झाली संस्मरणीय:
या वर्षीची वरसुआई मातेची यात्रा प्रत्येकाच्या मनावर अमीट ठसा उमटवणारी ठरली. निसर्गाच्या कृपेने झालेल्या हलक्याशा सरीही उत्सवाचा आनंद कमी न करता उलट तो वाढवणाऱ्या ठरल्या. गाव, पंचक्रोशी, तालुक्यातील लोकांनी एकत्र येऊन ही यात्रा खेळमेळ्यात आणि सलोख्याने पार पाडली.
या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण गावकऱ्यांचा, तरुणाईचा, ज्येष्ठांचा व देवस्थान समितीचा विशेष सहभाग होता. श्रद्धा, उत्साह, आणि एकोपा या त्रिसूत्रीवर उभा असलेला वरसुआई मातेचा यात्रोत्सव यंदा अनेकांच्या आठवणीत कायमचा घर करून गेला.
✍🏻डॉ. विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून.

