पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड) –
आज २१ व्या शतकात वावरत असताना तंत्रज्ञानाने अफाट प्रगती केली आहे.नाना शोध लावले असले तरी सहयाद्रीच्या दऱ्या खोऱ्यात अजूनही आतिशय दुर्गम गावे आहेत.तेथील काही वाड्या वस्त्यांना रस्ते नाहीत.काही घरांना लाईट पोहचली नाही,दवाखाना,पोस्ट,बस नाही.
अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अंतर्गत फोफसंडी हे अतिदुर्गम गाव आहे.खोल दरीत गाव आहे.येथे अजून दवाखाना,पोस्ट,बॅक,बस,धरण कोणतीही सुविधा नाहीत.येथील जीवनमान खूप हालाखीचे आहे.सखा आंबेकर,भरत वाजे,यश घोडे,केशव भांगरे आदींनी येथे भेट दिली.एक वास्तव सत्य समोर दिसले.येथील
काशिनाथ वळे यांचे कुटुंब अजूनही कावड्या डोंगराच्या कपारीत जनावरांसह राहतात.चिमुकल्या अपंग आदित्यचा कड्याकपारीच्या गुहेतील संघर्ष चालूच आहे.
काशिनाथ वळे यांच्या परीवारात दोन मुले, सुना,नातवंडे आहेत.त्यांचा नातू आदित्य दत्तू वळे हा पाच वर्षाचा आहे.तो पायाने अपंग आहे.त्याला दवाखान्यांत प्रवरानगर लोणी,अकोले, नगर येथे अनेक वेळा नेले. प्रत्येक वेळी डॉ.भेटी झाल्या नाहीत .
फोफसंडी ते बहिरोबा १५ किमी.चा प्रवास करत पायी चालत जावे लागते.पाठीला बांधून न्यावे लागते.गावात बस नाही. दवाखाना नाही.आणि तालुक्याच्या ठिकाणी कोणी विचारपूस करत नाही,ताटकळत ठेवले जाते.पुन्हा गावी यायला बस नसते. कुठेतरी रात्री अपरात्री थांबावं लागते.कितीतरी हेलपाटे मारले पण पदरी मात्र निराशाच पाहायला मिळाली.काहीही उपयोग झाला नाही.
काशीनाथ दादू वळे यांची हि गडद सात आठ पिढ्यांची साक्षीदार आहे.बाजूने दगड मातीने लिपून काढलेले अनेक वर्षापासूनचे नैसर्गिक घर आहे.ते कुटुंबासमवेत गाई गुरे,शेळ्यांसह गोठ्यात राहत आहेत.बाजूला कपारीत असलेल्या खोल्या म्हणजे जनावरां साठी लागणारा चारापेंढा ठेवण्यासाठी जागा आहे.तर दुसरी कपारी खोलीत गोवऱ्या, सरपण,
शेतीची अवजारे ठेवण्याची जागा आहे.त्यांचे गडदीतले पिढ्यानपिढ्यांचे बिनखर्चिक उबदार घर त्यातच राहायला आनंद मानतात.
चढ उताराची शेती.भात,नागली,वरई,सावा हे पिके घेतली जातात.पावसाळ्यात सर्व वाहून जाते.
शेतात काहीच पिकत नाही.पिकल तर टिकत नाही.जगल तर दिवसा वानरं,माकड खाऊन नासधूस करतात.त्यातूनही पिकल तर रात्री अपरात्री रानडुक्कर,सांबर,चितळ, गवा येऊन खाऊन जातात.उरलेल पिक रानची पाखरं खातात.हातात काही पिक उरत नाही.रोजगाराचे साधन नाही.डांगी जनावरां शिवाय पर्याय नाही.
हिरवा चारा असे पर्यंत तीनच महिने फक्त दूध असतं.तेही थोड्याच प्रमाणात.पावसाळ्यात खूप पाऊस कोसळतो जनावरे सुध्दा दगावले जातात.पंचनामा करुनही भरपाई मिळत नाही.इथे पिढ्यान पिढ्या असाच संघर्ष चालू आहे.
काशिनाथ दादू वळे त्यांचा दिव्यांग नातू आदित्य दत्तू वळे
त्यासाठी एक हात मदतीची, आधाराची,सहकार्याची गरज आहे.
ज्या दानशूर व्यक्तींना मदत करायची असेल त्यांनी आदित्य चे वडील
दत्तू काशिनाथ वळे यांच्या शी संपर्क करून मदतीचे आव्हान केले आहे.
मोबाईल नंबर..
दत्तू काशिनाथ वळे ८२०८२६०३०८
यशवंत घोडे ८९७५६६२०३५
[माझा सहा वर्षाचा नातू आदित्य पायाने अपंग असल्याने स्वतःच्या पायांवर उभा रहावून चालताना पाहायचा आहे-अजोबा काशिनाथ वळे ]
[माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे.शस्त्रक्रिया सर्जरीने सर्व शक्य आहे.दानशूर व्यक्तींनी मदतिचा हात पुढे केल्यास आदित्य निश्चित चालू शकेल -यश घोडे]

