पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी):
अकोले तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठाकरवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणास चालना मिळाली आहे.
या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे स्वतः उपस्थित होते. ह्यावेळी त्यांच्यासोबत दैनिक समर्थ गांवकरीचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रगतशील शेतकरी शिवाजीराव नामदेवराव नाईकवाडी मामा, शाळेचे मुख्याध्यापक बोराडे सर
हे देखील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, ड्रॉईंग साहित्य, रंग आदी शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी डॉ. आरोटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणाचे महत्त्व, मेहनतीचे मूल्य व सकारात्मक दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या माध्यमातूनच जीवनात सकारात्मक बदल घडवता येतो, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक शिक्षकवर्गाच्या सहकार्याने करण्यात आले. या उपक्रमामुळे ठाकरवाडीसारख्या दुर्गम भागातही शिक्षणाबाबत नवचैतन्य निर्माण झाले असून, अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून, समाजाभिमुख पत्रकारितेची ही सुंदर झलक अनेकांच्या मनात घर करून गेली आहे.


