पुण्य वार्ता
*-ज्ञानेश्वर खुळे-*
-----------
अकोले तालुक्यातील वीरगावात अवैध दारु वाहतुक करणा-या दोघांना पकडून गावातील तरुणांनी देशी आणि विदेशी दारुच्या 250 बाटल्या फोडल्या.विशेष म्हणजे वीरगाव ग्रामसभेत कायमस्वरुपी दारुबंदीचा ठराव होऊनही वीरगाव फाटा आणि वीरगाव नजीकच्या धांबोडी फाटा परिसरात अजूनही दारु विक्री सुरुच असल्याची माहिती मिळाली.
परिसरात विकली जाणारी देशी आणि विदेशी दारु ही बनावट असल्याने विक्रीतून मोठा नफा मिळतो.यामुळे सर्रासपणे या दारुची विक्री केली जाते.बनावट दारुमुळे अनेकांनी आपले जीव गमावले.वीरगाव फाट्यावर तर महिला आणि विद्यालयीन, महाविद्यालयीन विद्यार्थीनींना याचा कायम त्रास होतो.प्रचंड दहशतीखाली असणा-या महिलांचे जीवन असुरक्षित असल्याचे यावेळी तरुणांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी दहा वाजता धांबोडी फाट्यावरुन देवठाणकडे चोरट्या मार्गाने स्कुटीवरुन ही दारु वाहतुक सुरु होती.संदीप अस्वले यांच्या लक्षात हे आल्याने त्यांनी तात्काळ गाडी थांबवून गावातील तरुणांना पाचारण केले.
सोसायटीचे उपाध्यक्ष किसनराव अस्वले,ग्रा.पं.सदस्य नामदेवराव कुमकर, संदीप आस्वले,पोपट आस्वले, अंकुशराव थोरात,ज्ञानेश्वर वाकचौरे, सोमनाथ कुमकर,गणेश वाकचौरे,अभिमन्यू आस्वले,महेश राक्षे, रोहिदास तोरकड,नारायण सोनवणे,सुनिल कुमकर,लक्ष्मण आस्वले, गणेश कुमकर यांचे सहित अनेक तरुणांनी या बाटल्या जागेवर फोडल्या.अकोले पोलिस स्टेशन किंवा दारु उत्पादन शुल्क खात्याला कळविण्याच्या भानगडीत न पडता तरुणांनी थेट कारवाई केली.
वीरगाव ग्रामसभेत ठराव होऊनही अवैध दारु विक्री मात्र सुरुच आहे.कोणत्याही परिस्थितीत वीरगावची दारु विक्री बंदच करणार असा ठाम निर्धार उपस्थित तरुणांनी व्यक्त केला.
'वीरगांव' की 'चोरगांव'?
----------------------
अवैध दारुधंद्याने नशेत राहणारांची संख्या वाढल्याने वीरगावात चो-यांचे मोठे सत्र सुरु आहे.बिबट्याच्या दहशतीने लोक रात्री घराबाहेर पडत नाही.परिणामी बिबट्यांबरोबर चोरांचाही वावर वाढला.रोज गावशिवारात चोरी झाल्याची वार्ता नक्की असतेच.शेतक-यांची शेती औजारे,कृषी पंप,केबल,स्टार्टर,सायकल या चो-यांसहित धान्य आणि चपला-बुट चोरण्यापर्यंत चोरांची मजल गेली आहे.शुरांचा वारसा सांगणा-या ‘वीरगांव’ च ‘चोरगांव’ कधी झालं कळलंच नाही.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.