पुन्य वार्ता
ठाणे (प्रतिनिधी):
राज्यातील सहकारी चळवळीतील एक उज्ज्वल उदाहरण ठरलेली माळशेज नागरी सहकारी पतसंस्था आपल्या कार्यकुशलतेने आणि सभासद हिताचा विचार करत आज संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श संस्थेच्या रूपात नावारूपास आली आहे.
१९ जुलै रोजी माळशेज नागरी पतसंस्थेचा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला यावेळी,
संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सल्लागार थोर समाजसेवक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभहस्ते या अहवालाचे प्रकाशन ठाणे येथे करण्यात आले, यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. चंद्रकांत महाराज डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना डुंबरे, सभासद बंधू भगिनी तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालय, डुंबरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे संपन्न होणार आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, हरिभक्त परायण श्री. चंद्रकांत महाराज डुंबरे हे स्वतः राहणार असून यावेळी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा, शाखाविस्तार, गुंतवणूक धोरणे आणि भविष्यातील दिशा याबाबत सविस्तर माहिती सभासदांसमोर मांडली जाणार आहे.
प्रगतीचा आलेख – आर्थिक वर्ष २०२४-२५
संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली असून तिचा संमिश्र व्यवसाय ९० कोटी रुपयांवर गेला आहे. विशेष म्हणजे ६२ लाख रुपये शुद्ध नफा कमावणारी ही संस्था ११% लाभांश जाहीर करीत असून तो सभासदांच्या खात्यात थेट वर्ग केला जाणार आहे.
संस्थेची आर्थिक स्थिती खालीलप्रमाणे आहे:
गुंतवणूक – ₹17 कोटी 88 लाख 53 हजार 495
ठेवी – ₹42 कोटी 56 लाख 37 हजार 103
कर्जवाटप – ₹27 कोटी 79 लाख 6 हजार 758
भागभांडवल – ₹2 कोटी 16 लाख 34 हजार 400
मालकीच्या जागांमध्ये गुंतवणूक – शाखाविस्ताराचे धोरण प्रभावी!
संस्थेची विविध ठिकाणी कार्यरत असलेली माजीवाडा, कल्याण, घाटकोपर, कोपरखैरणे, डुंबरवाडी, आळेफाटा, बनकर फाटा, कारखाना फाटा, मढ–पारगाव, देवठाण आणि गणोरे येथील शाखा उत्कृष्ट प्रकारे कार्यरत असून यातील आळेफाटा, बनकर फाटा, गणोरे, देवठाण या शाखा संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या जागांवर स्थापन करण्यात आल्या आहेत.
नारायणगाव शाखेसाठी जागा खरेदीचा व्यवहार अंतिम टप्प्यात असून लवकरच ही शाखाही मालकीच्या ठिकाणी हलवली जाणार आहे. हे सर्व गुंतवणूक उपक्रम संस्थेच्या आर्थिक बळकटीचे द्योतक ठरत आहेत.
तीन संस्थांचे यशस्वी एकत्रिकरण – वसुली मोहिमेचे नियोजन
संस्थेने यापूर्वी श्री स्थानिक पतपेढी (ठाणे), ग्रेड पतपेढी आणि मुंबई जिल्हा महिला पतपेढी (भायखळा) यांचे एकत्रिकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या संस्थांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार आयुक्त पुणे यांच्याकडून मान्यता प्राप्त विशेष वसुली अधिकारी नियुक्त करण्यात आले असून ११ शाखांचे शाखाधिकारी आणि एसआरवर्ग यांच्या समन्वयाने वसुली मोहीम राबवली जात आहे.
शिस्तबद्ध प्रशासकीय व्यवस्थापन आणि तांत्रिक आधुनिकता:
संस्थेचे कामकाज तीन स्वतंत्र प्रशासकीय विभागांमध्ये विभागले असून, मासिक संचालक मंडळ सभा, कर्जवाटप समिती सभा आणि सर्व शाखांशी Zoom द्वारे होणारे मासिक संवाद यामुळे कामकाज पारदर्शकतेकडे झुकले आहे.
अध्यक्ष ह.भ.प. चंद्रकांत महाराज डुंबरे हे स्वतः कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहून सर्व शाखांचे कामकाज तपासतात. हे नेतृत्व संस्थेच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे मूळ मानले जाते. संस्थेचा कर्मचारी वर्गही कार्यक्षमतेने काम करत आहे.

सभासदांसाठी आवाहन:
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत महाराज डुंबरे, उपाध्यक्ष डॉ. धनंजय दांगट, संचालक गुरुदत्त सिंग, गोविंद डोंगरे, प्रवीण डोंगरे, दिनकर पाचंगे, गंगाराम कुराडे, अनिल ठोंबरे, बाळासाहेब डुंबरे, तसेच अॅड. संजीव कदम, सौरत्ना इंगळे, चैतन्य काळखैर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. नयना चंद्रकांत डुंबरे, गोविंद डुंबरे, अनिल डुंबरे, प्रविण डुंबरे, संस्थेचे सल्लागार नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी सर्व सभासदांनी ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सभेस उपस्थित राहावे, संस्था ही आपली आहे हे जाणून विश्वास दाखवावा, असे आवाहन केले आहे.
संपर्कासाठी:
मुख्य कार्यालय – माळशेज नागरी सहकारी पतसंस्था, डुंबरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे



