पुन्य वार्ता
ठाणे | दिनांक १९ जुलै २०२५ – ठाणे येथील एन.के.टी. ग्रुपच्या कार्यालयात आज एक विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्याचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांची दिशा आणि धोरण यावर मंथन झाले.
या चर्चासत्रात थोर समाजसेवक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्यात विशेष सविस्तर संवाद झाला. त्यांनी ३६५ दिवसांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला आणि भविष्यातील उपक्रमांसाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि दैनिक समर्थ गांवकरीचे मुंबई विभागीय संपादक दशरथ चव्हाण, दैनिक समर्थ गांवकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर, तसेच मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत शाळा-संस्था, आरोग्य शिबिरे, पत्रकार संरक्षण, समाजप्रबोधन, युवा घडवणूक आदी विषयांवर अभ्यासपूर्वक चर्चा झाली. यावेळी सामाजिक संस्थांच्या समन्वयाने जास्तीत जास्त जनतेपर्यंत उपयुक्त सेवा पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन नेटकेपणाने पार पडले असून, उपस्थितांनी भविष्यातील संयुक्त उपक्रमांसाठी एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.



