पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- अकोले तालुक्यातील
अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकरराव नवले हेच अध्यक्ष राहणार असा निकाल सह धर्मादाय आयुक्त ,पुणे 2 यांनी अहमदनगर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी दिलेला निकाल रद्दबातल करीत दिला असल्याने गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे.
अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पदावरून संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले व उपाध्यक्ष सुरेशराव कोते यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून कार्यकारिणीत वाद सुरू असून त्या वादाची न्यायालयीन लढाई चालू होती.अहमदनगर येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव कोते राहतील असा निकाल दिला.त्या निकालाच्या विरोधात मधुकरराव नवले यांनी पुणे येथील सह धर्मदायआयुक्त यांचे कडे अपील केले होते.सह धर्मदाय आयुक्त पुणे 2 यांनी काल दि.11 सप्टेंबर रोजी त्यावर मधुकरराव नवले हेच अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहातील असा शिक्कामोर्तब केले.
अभिनव च्या कार्यकारीणीतील वादामुळे विद्यार्थी व पालक कर्मचारी यांच्यात संभ्रमावस्था झाली होती.कर्मचाऱ्याला मारहाणी ही झाली होती.त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले होते.या निकालामुळे मधुकरराव नवले यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.तर हा सत्याचा विजय आहे,अभिनव परिवाराच्या दृष्टीने हा सोन्याचा दिवस पुन्हा उगवला असे मत अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी व्यक्त केले.
संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली अभिनव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अकोले तालुक्यात पहिले इंग्लिश मीडियम स्कुल सुरु झाले.त्यांनतर संस्थेचा शैक्षणिक विस्तार वाढत गेला. डी.एड.,बी एड.कॉलेज,एम बी ए कॉलेज,वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मुक्त विद्यापीठ नाशिक च्या माध्यमातून पत्रकारिता पदवी अभ्यासक्रम,वसुंधरा अकेडमी हे सुरू झाले.अतिशय शिस्तबद्ध व नियोजन बद्ध, गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा टिकवून आज अभिनव शिक्षण संस्था नावारूपाला आलेली आहे. कोणत्याच शिक्षण संस्थेत व शिक्षण क्षेत्रात वाद असू नये तालुक्यातील अनेक जाणकार मत व्यक्त करताना दिसत आहे.
