पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- भंडारदरा धरणाचा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय ऐतिहासिक नामकरण सोहळा राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या शुभहस्ते स्पिलवे गेटवर मोठया उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी परिसरातून व तालुक्यातून हजारो नागरिक उपस्थित होते.
यावेळी वीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती, यावेळी आदिवासी बांधवानी,महिलांनी,विद्यार्थी यांनी डी.जे .तालावर नृत्याचा ठेका धरला होता.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री मधुकरराव पिचड हे भावुक झाले होते.ते म्हणाले की, अकोले तालुक्यात असणाऱ्या भंडारदरा धरणाचे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असा अध्यादेश ४ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने काढला होता. माझ्या हस्ते आज मोठा ऐतिहासिक नामकरण सोहळा संपन्न होत आहे हे माझे भाग्य समजतो. हा माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे.राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.अकोले तालुक्यात असे अनेक क्रांतिकारक अनेक गावांमध्ये असून त्या त्या गावात त्या क्रांतिकारकांची स्मारके व्हावीत असे मत व्यक्त केले. वीर राघोजी भांगरे यांचा इतिहास शोधण्यासाठी कै. गोविंद गारे यांना लंडन पाठविले, तेथे ब्रिटिशांच्या ग्रंथालयात डॉ.गारे यांनी राघोजी भांगरे यांचा इतिहास शोधून काढला.तो इतिहास डॉ.गारे यांनी लिहिलेल्या पुस्तक रूपाने आपल्या समोर मला आणता आला.ठाणे येथील कारागृहात वीर राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारले,ठाणे चौकाला नाव दिले.वीर राघोजी भांगरे यांनी ब्रिटिशांविरुद्ध या भागात लढा दिला ,त्यांची आठवण चिरंतन राहण्यासाठी या ब्रिटिश सरकारने बांधलेल्या या धरणाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय नाव देण्याचा प्रस्ताव दिला त्यास राज्य सरकारने मान्यता दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
ते पूढे म्हणाले की, आपले क्रांतिकारक हे शाकाहारी होते,मात्र आता अकोले मध्ये 9 ऑगस्ट क्रांतिदिन कसा साजरा होतो ते आपण पहातच तरी.सर्वांनी वीर राघोजी भांगरे,शिवाजी महाराज आदी क्रांतिकारकांचा आदर्श ठेवून आपण काम केले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा सर्व इतिहास सांगितला.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वैभवराव पिचड,सौ.हेमलता ताई पिचड, मंगलदास भवारी,शिवाजीराजे धुमाळ, सीताराम देशमुख, दगडू पा.पांढरे, दादाभाऊ बगाड,सीताराम भांगरे,सोमनाथ मेंगाळ, गोविंद साबळे,काळू भांगरे, पांडुरंग खाडे, काशिनाथ साबळे,भरत घाणे,सी.बी.भांगरे,अनंत घाणे,सुनील सारुक्ते,काळू बुळे, संपत झडे, ज्ञानेश्वर झडे, सुरेश गभाले,आनंदराव वाकचौरे, बाळासाहेब वडजे,शरद नवले,राहुल देशमुख, कल्पनाताई सुरपुरीया, कमलताई बांबळे,सुनील देशमुख, राजू पा. देशमुख, कविराज भांगरे,माधव भोर, संतोष बनसोडे, गोकुळ
कानकाटे,बादशहा एखंडे,अर्जुन गावडे,संतोष सोडनर,श्री.बिन्नर आदींसह आदिवासी समाज बांधव,विद्यार्थी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले की ,भंडारदरा धरणाचा आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय नामकरण झाले, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांचे आभार मानतो.क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास हा नव्या पिढीला आदर्श ठरणारा असून यानिमित्ताने तो चिरंतन राहील.ते पूढे म्हणाले की,सध्या तालुक्यात जुन्या घरावर नवीन पत्रे टाकायचे काम चालू आहे,डांबरावर डांबर टाकले जात आहे आणि त्याला आपण विकास म्हणू लागलो,2500 कोटींचा निधी आला मात्र एक छोटासा बंधारा झाला नाही त्यामुळे आता आपणास मूलभूत प्रश्न असलेले शेती,पाणी ,रोजगार या विषयावर पुन्हा एकदा भविष्यात काम करावे लागणार आहे. शेतीला पूर्वी पाणी कमी लागायचे,आता शिवार फुलू लागले आहे.आपल्याला पाण्याची अजून गरज लागणार आहे.पुढे पाण्यावरून महायुद्ध होण्याची शक्यता असल्याने आपणास पाणी अडविणे व साठविणे यावर काम करावे लागणार असल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले. पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागणार आहे.असे ही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवाजीराजे धुमाळ यांनी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या विषयी माहिती देत आज शाळेत क्रांतिकारकांचा इतिहास मुलांपुढे चुकीचा येत आहे.त्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे.यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते.हा कार्यक्रम जरी वेगळा असला तरी पिचड साहेब यांचे तालुक्यासाठी असलेले योगदान पहाता त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वैभवराव पिचड यांना आमदार केल्याशिवाय आपण थांबणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी काळू भांगरे,दगडू पा.पांढरे,सोमनाथ मेंगाळ, दादाभाऊ बगाड,सीताराम देशमुख, कमलताई बांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री पिचड यांच्या जीवनातील संघर्ष सांगून असा नेता पुन्हा होणे नाही.असे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक सी .बी. भांगरे यांनी केले.सूत्रसंचालन शिवराम कोंडार यांनी केले तर आभार भरत घाणे यांनी मानले.

चौकट- निवडणूक जवळ आली की ,माझी वैयक्तिक जीवनावर निंदा नालस्ती केली जाते,माझी केस न्यायालयात चालू आहे, न्यायालय जो निर्णय देईल तो मला मान्य राहील. आम्ही राजकीय,सामजिक जीवनात कधीही खालच्या पातळीवर टीका केली नाही,कोणालाही त्रास दिला नाही.निवडणुकी बाबत भूमिका स्पष्ट करताना
निवडणूकीबाबत कार्यकर्त्यांनी मिटिंग बोलावावी, त्या मध्ये एकत्र बसून निर्णय घेऊ असे माजी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले.
चौकट- शरद टिपे यांनी आदिवासी आरक्षण, क्रांतिवीर राघोजी भांगरे आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर तयार केलेले गीत गाऊन सर्वांची मने जिंकली.


