पुण्य वार्ता
अकोले ( प्रतिनिधी): वीरगाव ता अकोले येथील ‘आंतरभारती’ संस्थेच्या आनंदगड शैक्षणिक संकुलात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी नवीन अक्युपंक्चर मेडिकल कॉलेज ला मान्यता प्राप्त झाली असून प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याची माहिती संस्थेचे सचिव अनिल रहाणे यांनी दिली. येत्या १९ नोव्हेंबर पासून कॉलेज सुरु होणार आहे.
महाराष्ट्र अक्युपंक्चर कौन्सिल मुंबई, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या कडून मातोश्री गंगुबाई शिंदे अक्युपंक्चर मेडिकल कॉलेज ला दोन वर्षीय पदविका अभ्यासक्रमास मान्यता प्राप्त झाली आहे. आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांची या अभ्यासक्रमास मान्यता असून वैद्यकीय क्षेत्रात पर्यायी उपचारपद्धती म्हणून व्यवसाय व देशासह परदेशात नोकरीच्या उत्तम संधी या उपचारपद्धतीच्या व्यावसायिकांसाठी उपलब्ध असल्याची माहिती अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी दिली.
सर्व सोयी सुविधायुक्त कॉलेज व हॉस्पिटल , प्रॅक्टिकल शिक्षणासाठी अक्युपंक्चर ,शरीररचना व संगणक प्रयोगशाळा तसेच पाश्यिमात्य औषधी अभ्यासक्रम या वैद्यकीय महविद्यालयात शिकविला जाणार आहे. १२ वी पास तसेच वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेवू शकतात. सर्व विषयांत निष्णांत अक्युपंक्चर तज्ञ घडविण्यासाठी तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग असून ५० विद्यार्थी प्रवेश क्षमता असल्याने लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.राज तासकर यांनी केले आहे.



