पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
तानाजीभाऊ जाधव : लोकांच्या मदतीला धावून जाणारा एक देवदूत
2 नोव्हेंबर: या दिवशी भारतात सर्वात मोठा वाढदिवस साजरा होत असतो. तो म्हणजे एका समाजसेवकाचा, एका देवदूताचा. या दिवशी करमाळा या छोट्याश्या गावात सुमारे २ लाख समाजसेवेने झपाटलेले उत्साही तरुण हजारो वाहनांच्या शिस्तबद्ध ताफ्याने, आपल्या लाडक्या ‘टायगर’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येथे उपस्थित होतात. “तानाजी भाऊ तुम आगे बढो, हम तूम्हारे साथ है, एकच गृप टायगर गृप” या घोषणांनी परिसर दणाणून जातो. या आधुनिक युगात तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे व्यक्तिमत्त्व, कोट्यावधी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या देवमाणसाचे टॅटू हजारो युवकांनी आपल्या शरीरावर गोंदवले आहेत. देशविदेशात तसेच दिल्ली पासून कन्याकुमारी पर्यंत मदतकार्य करून देवदूत ठरलेल्या या तानाजी भाऊंबद्दल चला थोडक्यात जाणून घेऊया.
डॉ तानाजी भाऊ जाधव एक असे दैवी व्यक्तिमत्व की ज्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी हजारो युवकांचा गराडा त्यांच्याभोवती नेहमी होतो. ते पुढे निघाल्यास शेकडो गाड्यांचा ताफा नकळत त्यांच्या सोबत जोडला जातो. ना कोणाचा राजकीय वरदहस्त, ना सेलिब्रिटी…. परंतु मोठ मोठ्या सेलिब्रिटींना देखील हेवा वाटावा असा रुबाब… आताच्या घडीला देश विदेशातील युवकांमध्ये सर्वाधिक क्रेझ असणारे नाव म्हणजेच डॉ तानाजी भाऊ जाधव उर्फ टायगर हे होय.
तानाजी गोकुळ जाधव यांचा जन्म २ नोव्हेंबर रोजी झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. लहाणपणा पासून कष्ट करत शिक्षण घ्यावे लागले. खडतर कष्टातून प्रवास करत असताना जेमतेम शिक्षण झालं. सुरुवातीपासूनच व्यायामाची त्यांना प्रचंड आवड त्यांना होती. थोरले बंधू वस्ताद जालिंदर भाऊ जाधव यांनी त्यांना कुस्तीचे धडे दिले. त्यामुळे कुस्ती हा त्यांचा आवडीचा खेळ होता. लहानपणापासूनच आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनात घर करून बसली होती. परंतु समाजाची सेवा करायची असेल तर तीही अगदी प्रामाणिकपणे आणि कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता करायची हे मात्र निश्चित झालं. मित्र जमवणं व टिकवणे या त्यांच्या सुप्त गुणांची त्यांना जाणीव झाली.
तानाजी भाऊ यांचे थोरले बंधू वस्ताद जालिंदर भाऊ यांनी सन २००६ मध्ये “टायगर ग्रुप” ची स्थापना केली आणि करमाळा या दुष्काळग्रस्त छोट्याशा खेड्यातून सामाजिक चळवळीची पाया भरणी झाली. तानाजी जाधव यांचे मित्र जमविण्याचे “रत्नपारखी” कौशल्य बघून या टायगर ग्रुपची अध्यक्ष पदाची धुरा संस्थापक वस्ताद जालिंदर भाऊ जाधव यांनी तानाजी यांच्याकडे सोपवली. आता ग्रुपच्या माध्यमातून परिसरातल्या लोकांच्या अडचणी सोडवण्याचं व मदत करण्याचं कार्य जोमात झालं. अनेकांची कोर्टात गेलेले विविध वाद टायगर ग्रुपच्या मध्यस्थीने मिटले, अनेकांची घटस्फोटाची प्रकरणे मिटून पुन्हा समेट घडवून आणण्यात डॉ तानाजी जाधव यशस्वी झाले व असंख्य कुटुंबे आनंदाने नांदू लागली. गावोगावी शेकडो तरुण या चळवळीने झपाटले. एकविचाराने जमलेले तरुण भाऊंच्या मार्गदर्शनाखाली निस्वार्थी समाजसेवा करु लागले. त्याचवेळी तानाजी भाऊ यांचे चूलत बंधू संदीप उर्फ पिंटू जाधव यांचा रस्ते अपघातात तातडीची मदत न मिळाल्याने मृत्यू झाला. आपल्या भावाला तातडीची मदत न मिळाल्याची खंत त्यांच्या मनात घर करून राहिली. वेळेत रस्ते अपघातात मदत मिळाली असती तर त्यांच्या भावाला जीवदान मिळाले असते, हे त्यांच्या लक्षात आले. आपल्या कुंटुंबातील हे दुःख ओळखून त्यांनी हे दुःख इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी टायगर ग्रुपचा विस्तार करमाळा तालुक्यापासून सोलापूर जिल्ह्यापर्यंत
केला. आता जिल्ह्यात रस्ते अपघात झाल्यास टायगर ग्रुपला संपर्क करून लोक तातडीची व मोफत मदत मिळवू लागले. लोकांचा लाभणारा उदंड प्रतिसाद बघून व गरज लक्षात घेऊन तानाजी जाधव यांनी टायगर ग्रुपचा विस्तार राज्यभर केला. कामाची व्याप्ती देखील वाढवली. मदत कार्याचे प्रकार वाढले. गरज येथे मदतकार्यासाठी तानाजी जाधव यांनी सर्व स्वयंसेवकांना धडे दिले. सध्या या टायगर ग्रुपचे एका महाकाय वटवृक्षात रूपांतर झाले असून दिल्लीपासून कन्याकुमारी पर्यंत टायगर ग्रुपचा विस्तार झाला आहे. विविध देशांमध्ये टायगर ग्रुपच्या कार्याचा बोलबाला असून दुबईमध्ये देखील भारतीय लोकांना मदत करण्यासाठी टायगर गृप मोलाचे कार्य करत आहे. आज भारतात सुमारे २५ लाख पेक्षा अधिक सक्रिय सभासद असून सुमारे ७ राज्ये, ६३ जिल्हे आणि ७५०० गावांमध्ये टायगर ग्रुपचा परिपूर्ण विस्तार झालेला आहे. येथे आता एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास तेथे तातडीचे मदतकार्य करून हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचे महान कार्य या ग्रुपच्या माध्यमातून घडत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. आता पर्यंत महाराष्ट्रातील १९,७०० अपघातग्रस्त व्यक्तींना यामुळे मदतीचा हात मिळाला आहे. यामुळे शेकडो रुग्णांना जीवदान मिळाले. अपघातग्रस्त व्यक्तीला बऱ्याचदा तातडीने योग्य रक्तगटाचे रक्त मिळत नाही ही अडचण सोडवण्यासाठी त्यांनी टायगर ग्रुपच्या पदाधिकारी व सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र मोठ मोठी रक्तदान शिबिरे व आरोग्य शिबिरे भरविण्याचे आवाहन केले. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभर टायगर ग्रुपच्या प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. यानिमित्त दररोज देशभर विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम पार पडत असतात. कोरोना महामारीच्या काळात तानाजी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सुमारे ५००० पिशवी रक्तदान करून राज्याला आणीबाणीच्या प्रसंगी मोठा आधार दिला. मागील दशकात सुमारे ३५०० भव्य रक्तदान शिबिरे संपन्न झाली. यामध्ये ४५,७४० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटे दरम्यान ग्रुपच्या वतीने महाराष्ट्र व गुजरात येथील ७ सरकारी रुग्णालयांना ऑक्सिजन सेवा पुरवण्यात मोलाचा हातभार लावला. अटीतटीच्या प्रसंगी डॉ तानाजी जाधव यांनी स्वतः आपल्या ग्रूपचे नेतृत्व करत सुमारे ५८४० मृतदेहांवर जाती धर्माचा विचार न करता आपापल्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले. आजरोजी दिल्ली पासून कन्याकुमारी पर्यंत सर्वत्र तानाजी जाधव यांचा मित्रपरिवार टायगर ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाची सेवा करत आहे. परदेशात देखील अनिवासी भारतीय टायगर ग्रुपच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. दुबईमध्ये देखील टायगर गृप सक्रिय असून तेथील भारतीयांना मदत मिळवून देत आहेत. आयुष्यात मित्र चांगले असले की त्या माणसाला शक्यतो अडचणींचा सामना करावा लागत नाही, मित्रांच्या मदतीने आलेल्या अडचणींवर मात करता येते म्हणूनच भाऊ नेहमी म्हणतात की, “माझा हात धरून चला… तुम्हाला कोणाचे पाय धरण्याची वेळ येणार नाही”. आज रोजी भाऊंच्या मोबाईलमध्ये ५ लाखाहून अधिक मित्रांचे नंबर सेव्ह आहेत. यामध्ये सर्वसामान्यांपासून आयएएस, आयपीएस, आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांचा समावेश आहे. हे सर्व तानाजी भाऊंच्या समाजकार्याने परिचित असल्याने अडचणीच्या वेळी मदत करण्यास तत्पर असतात. देशभर टायगर ग्रुपच्या माध्यमातून अनाथ आश्रमात अन्नदान व कपडे वाटप, वृद्धाश्रमात अन्नदान व कपडे वाटप, गो शाळेत चारा वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गरजू शालेय मुलींना मोफत सायकल वाटप, गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, साडी वाटप करून महिलांचा सन्मान, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, माळरानावर वृक्षारोपण, फळझाडे लागवड, विविध गुणकारी औषधी वृक्षांची लागवड, रक्तदान शिबिर, रुग्णालयात फळवाटप, गोर गरीबांना ब्लँकेट वाटप, गोरगरिबांना मोफत किराणा व भाजीपाला वाटप, दिवाळी फराळ वाटप, मोफत आरोग्य शिबीर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, दिव्यांग व्यक्तींना मोफत व्हीलचेअर व विविध उपयोगी साहित्य वाटप, अंधांना काठी व विविध प्रकारचे साहित्य वाटप, बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे यासारखे असंख्य उपक्रम टायगर ग्रुपच्या सदस्यांच्या वाढदिवशी आयोजित केले जातात. वाढदिवसानिमित्त अनेक अनाथ मुलांना ग्रुपच्या माध्यमातून दत्तक घेतले असून त्यांचा सर्व खर्च ग्रुपच्या माध्यमातून केला जातो. अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च देखील टायगर ग्रुपच्या माध्यमातून केला आहे. टायगर ग्रुपच्या धेय्याने झपाटलेले तरुण गरज येथे मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहेत. विविध ठिकाणी यात्रोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचे मदतनीस म्हणून शासनास मदत करत असतात. तर सण उत्सव काळात स्वच्छ्तादूत म्हणून सेवा देतात. देशभरात टायगर ग्रुपचे सदस्य वाढदिवसानिमित्त जे जे उपक्रम राबवितात त्याचा लेखजोखा, कार्य अहवाल व प्रकाशित झालेल्या बातम्या आपल्या लाडक्या तानाजी भाऊंना देऊन शाबासकी मिळवतात. अनेक टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गो शाळेला दररोज सुमारे एक ते दोन टन हिरवा चारा ६ महिन्यापर्यंत दिला व शेकडो शालेय गरजू मुलींना मोफत सायकलींचे वाटप केले. टायगर ग्रुपच्या वतीने देशात व राज्यात दररोज विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम होत असतात. ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याला आळा घालण्यासाठी या ग्रुपने मागील १२ वर्षात ७ जिल्ह्यांत सुमारे ९ लाख झाडे लावली असून त्यांची देखभाल केली आहे. डॉ जाधव यांनी ६७२० गरीब गरजूंना कपडे, औषधोपचार, व्हीलचेअर, श्रवण यंत्र व चष्मे यांचे मोफत वितरण केले. हा ग्रुप संपूर्ण महाराष्ट्रात १३ अनाथ आश्रम व वृद्धाश्रम चालवत आहे. याशिवाय आळंदी येथील ‘आनंद तरंग’ हे बालसंगोपन केंद्र देखील चालवत आहे. समाजसेवा या एकविचाराने एकत्र आलेले हे तरुण टायगर ग्रुपच्या माध्यमातून क्रांती घडवत असून १६ पेक्षा अधिक अँब्युलन्स टायगर ग्रुपच्या माध्यमातून राज्यभर सेवा देत आहेत. कोल्हापूर सांगली भागात २०१८ साली पूरस्थिती निर्माण झाली होती यावेळी देखील टायगर ग्रुपने सुमारे ३८ ट्रक जीवनावश्यक साहित्यांची मदत केली, येथे चार दिवस थांबून अनेकांना स्थलांतरासाठी मदत केली व ठिकठिकाणी मदत केंद्र उभारून मोफत अन्नछत्र स्थापन केले. केरळ महापुरात देखील रेल्वेच्या स्पेशल बोगी बुक करून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. यावेळी केरळ सरकारला मदत निधी म्हणून सुमारे ११ लाख ३८ हजार रुपयांचा मदत निधी देखील सुपूर्द केला. कोकणातील चिपळूण महाड खेड येथे जी पूरस्थिती निर्माण झाली होती, तेथे टायगर ग्रुपच्या सहकाऱ्यांनी तळ ठोकून बचाव कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला व मदतकार्य करून अनेकांचे प्राण वाचवले व सुमारे २४ ट्रक जीवनावश्यक साहित्य, कपडे, अन्नधान्य, ब्लँकेट, फास्ट फूड, औषधोपचार साहित्य आदींचा पुरवठा केला व मोफत अन्नछत्र उभारले व महाड, चिपळूण दुर्घटनेतून लोकांना मदत करण्याचे महान कार्य केले.
भारतात गोमातांची पूजा केली जाते. तर बऱ्याचदा या गायी छुप्या मार्गाने कत्तली साठी जात असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी रस्ते वाहतुकीतून कत्तली साठी जाणाऱ्या शेकडो गोमातांची सोडवणूक केली व संबंधित इसमांवर गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले, अशा गोमातांच्या कत्तली रोखण्यासाठी महामार्गावर जागता पहारा ठेवला व शेकडो गोमातांना जीवदान दिले. आजही टायगर ग्रुपचे पदाधिकारी गो तस्करांवर नजर ठेऊन जागता पहारा ठेवत आहेत. जेथे गरज तेथे मदत करण्याचा संकल्प असल्याचे ते आवर्जून सांगतात. टायगर ग्रुपचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, केरळ यासारख्या अनेक राज्यांत झालेला दिसतो. तानाजी जाधव यांचे कार्य बघून व त्यांची वाढती क्रेझ व सामाजिक कार्य ओळखून अनेक पक्षांनी त्यांना राजकारणात येण्याची ऑफर दिली. खासदारकी वा महत्त्वाच्या महामंडळावर घेण्याचे किंवा कुस्ती महामंडळ देण्याचे आश्वासन दिले. परंतु तानाजी भाऊंनी सर्वांसोबात सलोख्याचे संबंध ठेऊन “मला फक्त आणि फक्त समजसेवाच करायची आहे राजकारण हा माझा पिंड नाही” असे सांगून राजकारणा प्रती नापसंती दर्शविली. आजदेखील जाधव हे युवकांनो निर्व्यसनी रहा, व्यायाम करा, आपल्या उत्पन्नातील काही भाग गोरगरिबांसाठी खर्च करा, गुन्हेगारी पासून दूर रहा. सामाजिक बांधिलकी जोपासा व देशाच्या आर्थिक जडणघडणीत भरीव योगदान द्या व आपल्या देशाची मान उंचावेल असेच काम करा असा मोलाचा संदेश देतात.
वाढती लोकसंख्या व त्यावर असणारे बेरोजगारीचे सावट दूर करण्यासाठी टायगर
ग्रुपच्या वतीने रोजगार मेळावे आयोजित करून सुमारे २५००० हून अधिक बेरोजगारांना तानाजी जाधव यांनी नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलव्ध
करून दिला. यामध्ये सुशिक्षित व
अशिक्षित असणाऱ्या सर्वांनाच आपापल्या कौशल्या प्रमाणे रोजगार दिला. जाधव यांनी ग्रुपच्या माध्यमातून गरिबी, आरोग्य, दर्जेदार शिक्षण, स्वच्छ पाणी व निसर्ग, व लोकांची आर्थिक उन्नती यासाठी देशाला मोठे योगदान दिले. याच सामाजिक उपक्रमांची दाखल घेऊन २०१७ साली वी केअर फाउंडेशनच्या वतीने पुणे येथे राज्यस्तरीय सामाजिक कार्याबद्दल ‘सोशल वर्कर’ पुरस्कार दिला. २०१८ मध्ये भूमाता फाउंडेशनच्या वतीने पुणे येथे’ क्रांतिवीर’ पुरस्कार मिळाला. २०२१ मध्ये ‘सरदार उद्धम सिंग फाउंडेशन परभणी’ यांच्या कडून “जननायक” पुरस्काराने गौरविण्यात आले. तर मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद दामोदरदास मोदी यांचे प्रमुख उपस्थितीत सामाजिक उपक्रमांची दाखल घेऊन नेल्सन मंडेला नोबेल शांती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. व प्रल्हाद मोदी यांनी देखील टायगर ग्रुपच्या कार्याबद्दल विशेष कौतुक केले. तर अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पिस यांनी तानाजी जाधव यांना सामाजिक कार्याची दखल घेत “डॉक्टरेट” पदवी प्रदान केली. डॉ तानाजी भाऊ जाधव हे दैनिक समर्थ गावकरी या वृत्तसमुहाचे ‘समूह सल्लागार’ आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वास आरोटे यांच्या सोबत ग्रामीण पत्रकारांना न्याय देण्याचे मोलाचे कार्य देखील करत आहेत. आयुष्यात शिक्षण हेच सर्वस्व नसून अल्प शिक्षण झालेल्या या युवकाने संपूर्ण भारतातील तरुणांपुढे आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी लाखो समाजसेवक घडवले असून ते स्वतः एक चालते फिरते समाजसेवक घडवणारे विद्यापीठ आहेत. त्यांच्या कल्पकतेतून टायगर गृप हा एक महाशक्तीशाली गृप बनला असून टायगर गृप हा आपल्या शक्तीचा उपयोग हा फक्त गोरगरिबांच्या कल्याणासाठी करत असल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यांच्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची अडचण सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. म्हणूनच ते कोणतीही अडचण असो, जात पात धर्म न पाहता मदतीसाठी धावून जाणारे “देवदूत” ठरले आहेत. त्यांच्या या महान कार्यामुळे करमाळा या छोट्याशा गावचं नाव जगाच्या कानकोपऱ्यात पोहचलं आहे.

पुतळाबाई जाधव (डॉ.तानाजी जाधव यांच्या मातोश्री)
” करमाळ्यात दररोज रस्त्याने जाता येता अनेक ओळखीची व अनोळखी माणसे भेटतात. तानाजी भाऊंना ऑफिस मध्ये भेटून त्यांची फार महत्वाची कामे झाल्याचं सांगतात. गोरगरीब लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप समाधान मिळतं आणि तानाजी करत असलेल्या कामाचा अभिमान वाटतो. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर दोन्ही भावांनी एकमेकाला आधार दिला, खचून न जाता कष्ट करून वाटचाल सुरू ठेवली. त्यांनी परोपकारी भावनेतून अनेक चांगली माणसं जोडून टायगर ग्रुपचे महाकाय वटवृक्षात रुपांतर केले, त्याच्या वाढदिवशी होणारी गर्दी हीच खरी त्याच्या कामाची पावती आहे.”
जालिंदर भाऊ जाधव (संस्थापक, टायगर गृप) “टायगर ग्रुपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तानाजी जाधव यांच्याकडे दिल्यापासून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. टायगर ग्रुपच्या धेय्य धोरणांना यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशभर फिरून ग्रुपची बांधणी केली. ग्रुपच्या आजच्या या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.”
श्री श्री रविशंकर (अध्यात्मिक गुरू, आर्ट ऑफ लिव्हिंग) तानाजी जाधव यांचे समाजकार्य हे विश्व कल्याणकारी आहे. “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती” या उक्तीप्रमाणे त्यांचं कार्य सुरू आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता करत असलेले हे समाजकार्य करण्यासाठी परमेश्वर त्यांना निरंतर शक्ती देवो…खूप सारे आशीर्वाद.
प पू अण्णासाहेब मोरे गुरुमाऊली (श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग. दिंडोरी प्रणित) तानाजी भाऊ जाधव यांच्या समाजकार्याने देश सुपरिचित आहे. खरं तर स्वामी समर्थच त्यांच्याकडून ही अनोखी सेवा करवून घेत आहेत. त्यांच्या निरपेक्ष समाजकार्याने लाखो युवकांना या सेवेमध्ये येण्यासाठी प्रवृत्त केले आहे. यामुळे लाखो समाजसेवक घडले आहेत. त्यांचं हे स्वामी कार्य अखंडितपणे सुरू राहो… आशीर्वाद
प्रल्हादभाई मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू) ” तानाजी जाधव यांचं समाजकार्य देशासाठी अभिमानास्पद आहे. देशविदेशात टायगर ग्रुपकडून लोकांना मिळणारी मदत ही थक्क करणारी आहे. त्यांना त्यांच्या या चांगल्या कामाचे फळ देखील नक्कीच मिळेल.”
मदन महाराज गोसावी ( सुप्रीम कोर्टाचे नि. न्यायाधीश) तानाजी जाधव यांनी देशभर समाजकार्य व आरोग्याप्रती जनजागृती केली. त्यामुळे तरुणांमध्ये असणारी ऊर्जा योग्य दिशेला सत्कारणी लागली. आजचा तरुण हा अनुकरणप्रिय आहे. निर्व्यसनी रहा, व्यायाम करा, आपल्या उत्पन्नातील काही भाग गोरगरिबांसाठी खर्च करा, गुन्हेगारी पासून दूर रहा, सामाजिक बांधिलकी जोपासून देशाच्या जडणघडणीत भरीव योगदान द्या. आपल्या देशाची मान उंचावेल असेच काम करा हा तानाजी भाऊंचा तरुणांना संदेश मोलाचा आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आर सी जव्हेरी (रॉयल फॅमिली अडव्हायझर,दुबई) “तानाजी भाऊ यांची दुबईत देखील मोठी क्रेझ आहे. भारतातून दुबईत नोकरी, व्यवसायानिमित्त आलेल्या लोकांची दुबईत फसवणूक होऊ नये; म्हणून आम्ही दुबईत टायगर ग्रुपची शाखा सुरू केली आहे. याला भारतीयांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. येथे शेकडो भारतीयांना या ग्रुपच्या माध्यमातून मदत मिळत आहे. अडचणीच्या काळात आपले कोणीतरी दुबईत मदत मिळवून देत असल्याने भारतीयांना दिलासा वाटत आहे. “
पद्मश्री डॉ. चंद्रकांत पांडव (आयोडीन मॅन ऑफ इंडिया)” राजकारणासाठी परिस्थिती अनुकूल असून सुद्धा तानाजी भाऊंनी समाजकारण सोडले नाही. त्यांनी जो अविरत समाजकार्याचा ध्यास घेतला आहे तो गौरवास्पद आहे. सामाजिक कामे करून देखील अत्युच्च शिखर गाठता येते, तानाजी भाऊ त्याचे एक उदाहरण आहेत. आजचे तरुण हे तानाजी भाऊंना आदर्श मानतात. अन् तरुण हे अनुकरण करत असल्याने तानाजी भाऊंना असंख्य युवा समाजसेवक घडवणे शक्य झाले. त्यांचं हे समाज कार्य अविरत सुरू राहो; ह्याच सदिच्छा. “
डॉ.विश्वासराव आरोटे (राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ) महाराष्ट्रात महाड, चिपळूण भागात पुर आपत्ती ओढवली होती. राज्य पत्रकार संघाच्या वतीने मदतीचे दोन कंटेनर साहित्य घेऊन जात असताना “टायगर गृप”चे मदतकार्यासाठी निघालेले १०- १२ ट्रक रस्त्याने दिसले. अपत्तीग्रस्त चिपळूणमध्ये पोचल्यावर, पूरग्रस्त भागात शेकडो टायगर ग्रुपचे स्वयंसेवक जीवाची बाजी लावून मदतकार्य करताना पाहिले. हे स्वयंसेवक पहिल्या दिवसापासून मदतकार्यासाठी तळ ठोकून असून प्रचंड मेहनत घेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. एवढी मोठी मदत करून देखील या ग्रुपला तशी प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत वाटली. अन् या टायगर ग्रुपच्या अध्यक्षांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली. तानाजी भाऊंना माणसांची फार पारख असून ते “रत्नपारखी” स्वभावाचे असल्याचे पहिल्याच भेटीत कळलं. अन् त्यांच्याकडे चांगली माणस जोडण्याची कला असल्याने त्यांनी मला कधी आपलेसे केलं कळलेच नाही. या ग्रुपच्या माध्यमातून रोजच असंख्य सामाजिक उपक्रम राबविले जातात. एवढं मोठं सामाजिक कार्य असताना प्रसिद्धी पासून दूर असणाऱ्या या ग्रुपला प्रामाणिकपणे आपल्या दैनिकांतून प्रसिद्धी देण्याचं ठरवलं. अन् त्यांच्या समाजकार्याप्रमाणे आमचं प्रसिद्धीचे कार्य देखील निरपेक्षतेने असेच अविरतपणे चालू ठेवलं. दिलदार तानाजी भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आय पी एस मनोज लोहिया (नि. पोलिस आयुक्त छ.संभाजीनगर) “तानाजी जाधव व त्यांचा टायगर गृप हे त्यांच्या सामाजिक कामासाठी परिचित आहेत. मी पोलीस दलात कार्यरत असताना त्यांच्याशी ओळख झाली. त्यांनी कधीही चुकीच्या गोष्टींचे समर्थन केले नाही. किंवा एखाद्या पदाधिकाऱ्याने टायगर ग्रुपच्या नावाचा गैरवापर केल्यावर देखील कधीही पाठराखण केली नाही. त्यांचं सुरू असलेले भव्य समाजकार्य असेच पुढे सुरू राहो. “
विनय सपकाळ (अनाथांची माय, सिंधुताई सपकाळ यांचे सुपुत्र)
आदरणीय तानाजी भाऊ, आज आपला वाढदिवस… आदरणीय माई आणि माई परिवारावर प्रचंड प्रेम केलत तुम्ही.. माईच्या सुख दुःखात तुम्ही नेहमी असायचा, आज माई गेल्या नंतर सुद्धा तुम्ही ते प्रेम कमी होऊ दिलं नाही, संस्थेला काय अडचण वगैरे तर नाही ना, मुलं बरी आहेत ना अशी सतत तुम्ही विचारपूस करत असता.. मैत्री च्या दुनियेतील राजा माणूस अशी तुमची ओळख तुमच्या स्वभावाने तुम्ही सार्थ करून दाखवली, माई म्हणायची ” तानाजी जरी तू पैलवान असलास तरी तुझं काळीज मात्र आईच आहे, असेच छान राहा..तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.
डॉ. ललवाणी (डायरेक्टर, डेक्कन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,पुणे) तानाजी भाऊंनी आरोग्य क्षेत्रामध्ये फार महान कार्य केले आहे. त्यांनी शेकडो गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात अथवा मोफत उपचारासाठी मदत मिळवून देण्यासाठी; मला फोन करून मदत घेतली आहे. गोरगरिबांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी या माणसाची खरी तळमळ मला पाहायला मिळाली. खरं तर”आपली माणसं” या माझ्या सेवाभावी संस्थेमुळे तानाजी भाऊंची अन् माझी ओळख झाली. महाराष्ट्रातून पुण्यात आलेल्या लोकांची ही संस्था आहे. या संघटनेच्या माध्यमातून मी लोकांना मदत करतो. तानाजी भाऊंची गोरगरिबांसाठी असणारी तळमळ बघून त्यांनी पाठवलेल्या शेकडो गोरगरीब रुग्णांचे मी निम्म्या किमतीत यशस्वी ऑपरेशन केले आहेत. कोविडमध्ये देखील असंख्य रुग्णांना राज्यभर बेड उपलब्ध करून दिले. तसेच माझ्या ओळखीच्या माध्यमातून भारतातील दिल्ली, इंदोर, बँगलोर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी शेकडो रुग्णांची लाखो रुपयांची बिले कमी करून दिली आहेत. गोरगरिबांसाठी निस्वार्थीपणे झटणाऱ्या या तानाजी भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
पैलवान संतोष वेताळ (हिंदकेसरी) तानाजी भाऊ हे पैलवान असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलाने सामाजिक कार्य करून एवढी मोठी तरुणांची फळी निर्माण केली. आहे त्याचा आमच्या कुस्ती क्षेत्राला अभिमान आहे. त्यांचे हे समाजकार्य अखंडितपणे चालू राहावं; तसेच आमच्या कुस्ती क्षेत्राला त्यांचे सहकार्य लाभावं. महाराष्ट्रातील तमाम गरजूंना बेरोजगारांना नोकरी देऊन, तसेच महिलांना सुरक्षा देऊन संकटकाळी त्यांच्याकडून असेच सहकार्य लाभो. त्यांची भविष्याची वाटचाल अशीच चालू राहो या शुभेच्छा.
शितल नगराळे (वनपरिक्षेत्र अधिकारी धुळे) “टायगर ग्रुपने मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट परिसरात वृक्षारोपण केले आहे. फॉरेस्ट मध्ये उन्हाळ्यात जंगल परिक्षेत्रात पाण्याची टंचाई भासल्यावर या ग्रुपकडून दरवर्षी पाण्याची मदत मिळते. आवश्यक तेव्हा पाण्याचे टँकर सुरू करून प्राण्यांची तहान भागवली जाते. हे कार्य ते स्वयंस्फूर्तीने करतात. जंगली प्राणी रस्त्यावर आल्याने अपघात घडल्यास टायगर ग्रुपकडून तातडीची मदत देखील मिळते. टायगर ग्रुपच्या तानाजी भाऊंचे सेवाभावी वृत्तीने केलेले कार्य अभिमानास्पद आहे.”
साई तुलसीगिरी (प्रमुख सदस्य टायगर गृप, आलापल्ली) “आम्ही गडचिरोली, आलापल्ली या नक्षलग्रस्त भागातील असल्याने बहुतांश ठिकाणी रस्ते, पुल यासारख्या सुविधा नाहीत. येथे शासनाला अनेक काम करणे अवघड जाते. त्यातच प्रचंड मोठा नेटवर्कचा प्रॉब्लेम देखील आहे. येथे १०८ ही अँब्युलन्स सुविधा देखील फार कमी चालते. मी सात वर्षापूर्वी टायगर ग्रुपच्या माध्यमातून तानाजी भाऊंसोबत जोडलो आहे. त्यांच्या समाजकार्याने प्रेरित होऊन तीन मोफत रुग्णवाहिका येथे चालू केल्या. याठिकाणी टायगर ग्रुपच्या समाजकार्याला कुठलीही बाधा येत नाही. यासोबतच आम्ही टायगर ग्रुपच्या माध्यमातून शववाहिका व शवपेटीची देखील मोफत सेवा पुरवतो. तरी दररोज २ ते ३ रुग्णांना या रुग्णवाहीकेमुळे जीवदान मिळत आहे. सुमारे नऊ गर्भवती महिलांनी रुग्णवाहिकेमध्ये बाळांना सुखरूप जन्म देखील दिला आहे. इथे टायगर गृप हा खरोखर देवदूतच आहे. तानाजी भाऊंना वाढदिवसाच्या मनःपर्वक शुभेच्छा. “
नवनाथ जाधव

