पुण्य वार्ता
अकोले,प्रतिनिधी:
अकोले तालुक्यातील ज्येष्ठ पेपर विक्रेते तसेच भारतीय डाक विभागात तब्बल 41 वर्षे सेवा केलेले पांडुरंग आरोटे आज सेवानिवृत्त झाले. आपल्या कार्यकाळात पेपर वितरक म्हणून सुरुवात करत, पिग्मी एजंट आणि त्यानंतर भारतीय डाक विभागात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. कामामध्ये नेहमीच प्रामाणिकपणा, मनमिळावूपणा आणि माणुसकीच्या भावनेने वागणाऱ्या पांडुरंग आरोटे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले.
आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने दैनिक समर्थ गांवकरी समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी त्यांना सन्मानित केले.
कार्यक्रमात बोलताना डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले, “पांडुरंग आरोटे हे त्यांच्या कार्यपद्धतीसाठी आणि सर्वांसोबत मनमिळावूपणे वागण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी 41 वर्षे भारतीय डाक विभागात केलेली सेवा ही भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा अनुभव समाजासाठी मार्गदर्शक ठरेल.”
या समारंभाला त्यांच्या मित्रपरिवाराने उपस्थिती दर्शवली. पांडुरंग आरोटे यांनी यावेळी आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानत पुढील काळात समाजसेवेसाठी योगदान देण्याचा मानस व्यक्त केला.
सेवानिवृत्तीचा हा सोहळा त्यांच्या कार्याची आठवण कायम ठेवणारा ठरला आणि त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
