पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- बालवाडी ते ५वी पर्यंतच्या शिकणाऱ्या २० विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त गुणांनी तीन तासापेक्षा जास्त वेळ २६ सांस्कृतिक कार्यक्रमातून जल्लोष करीत भोजदरी पंचक्रोशीसह तालुक्यातील व तालुक्याबाहेरील रसिक प्रेक्षकांना मंत्र मुग्ध करीत सर्वांची मने जिंकली.या सर्व सादरीकरणाला दाद देत रसिकांनी बक्षिसांचा वर्षाव केला.
अकोले तालुक्यातील आदिवासी पेसा क्षेत्रातील विठे गावाची भोजदरावाडी असून तेथे जि.प.प्रा.शाळेत बालवाडी ते ५ वी पर्यंतचे वर्ग असून एकूण २२ विद्यार्थ्यांचा पट आहे.गर्दी पेक्षा दर्दी असलेल्या या चिमुकल्यांनी अक्षरशः तीन तासापेक्षा जास्त वेळ सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जल्लोष साजरा केला.
या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी मनमुराद दाद देत सांस्कृतिक कार्यक्रमांस शाळेस एक लाखापेक्षा जास्त रकमेच्या बक्षिसांचा वर्षाव केला. स्वच्छ व सुंदर परिसर,आकर्षक विद्युत रोषणाई, सुंदर रंगमंच,उत्कृष्ट ध्वनिव्यवस्था व सूत्रसंचालन, महिला दिनानिमित्त केलेला महिलांचा सन्मान, उच्च पदस्थ अधिकारी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान,आलेल्या दानशूर व्यक्तींचा सन्मान , विद्यार्थ्यांची शिस्त ,गावकऱ्यांचा शिक्षकांवरील विश्वास या मुळे ही शाळा सर्वांना आपलीशी वाटत असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

मुख्याध्यापक तथा शाळा प्रमुख अनिल कुटे व त्यांचे सहकारी दिनकर अस्वले या दोन शिक्षकांनी या शाळेला जिल्ह्यात नावारूपाला आणले असून त्यांच्या परिश्रमाची दखल घेत व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहता भोजदरीची ही
शाळा अद्यावत करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती पुढे येताना दिसत आहे.रोटरी क्लब अकोले ने ही शाळा ‘ रोटरी हॅपी स्कुल ‘ बनविण्यासाठी प्रयत्न करीत असून अनेक भौतिक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत व देणार आहेत.

या सांस्कृतिक कार्यक्रमानन्तर ग्रामस्थांनी स्वतः पुढे येऊन सर्व रसिकांना स्नेह भोजन दिले व ही प्रथा गेल्या ११वर्षापासून चालू आहे.
विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर या चिमुकल्यांनी , गावकरी व महिलांनी ११००लोकांना भोजन वाढण्याचे काम करताना पाहून सर्व उपस्थित नागरिकांना कुतूहल वाटले.
ही शाळा तालुक्यात आदर्श शाळा म्हणून नावारूपाला येत असून या शाळेस दातृत्ववान नागरिकांनी आवश्य भेट द्यावी .

