पुन्य वार्ता
कोपरगाव-
कोपरगाव येथील अंगणवाडी सेविकांचा सन्मान राज्यासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशसरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांनी केले आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांचा सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने नुकताच पंचायत समिती कार्यालय, कोपरगाव येथे करण्यात आला यावेळी ते बोलत होते .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणूका कोल्हे, निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, पशुधन अधिकारी डॉ. श्रद्धा काटे, महिला व बाल विकास अधिकारी रुपाली धुमाळ , भागवताचार्य काविताताई साबळे ,संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे आदी उपस्थित होते .
डॉ आरोटे पुढे बोलताना म्हणाले की, पत्रकाराकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो परंतु पत्रकार हा एक समाजसेवकच आहे .गेली वीस- पंचवीस वर्षे पत्रकार क्षेत्रात काम करीत असताना अनेक सामाजिक उपक्रम आम्ही घेतले आहेत. अंगणवाडी सेविकांचा सन्मान करणे महत्त्वाचा उपक्रम असून आमच्यासाठी तो एक आदर्श आहे. ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना पत्रकार आठवत असतो. आमचे पत्रकार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के पत्रकारिता करतात. अंगणवाडी सेविका व मदतनीसंचा सन्मान हे आमचे भाग्य आहे. कोपरगावच्या पत्रकार संघाच्या वतीने सेवकांचा सन्मान हा राज्यासाठीच नाही तर देशासाठी एक आदर्श ठरेल असे सांगत पत्रकार संघटनेच्या तालुका पदाधिकाऱ्याचे कौतुक केले.

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुका कोल्हे यांनी बोलताना सांगितले की, प्रत्येक महिला रोज आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असतात. या समाजात महिला म्हणून राहणी सोपे नाही .समाजात आपल्याला टिकून राहायचे आहे. घरदार सांभाळून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. पत्रकारांमध्ये फार मोठी शक्ती आहे म्हणून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कडक कायदे करण्यासाठी शासनाला पत्रकारांनी भाग पाडावे असे आवाहन केले.
भागवताचार्य कविता साबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपणच आपल्या घराच्या गृहमंत्री ,अर्थमंत्री, दूरसंचारमंत्री ,पालकमंत्री आहोत. आपणच आपले कुटुंब सांभाळलं पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले परंतु त्याचा स्वैराचार करता कामा नये. कायदा महिलांच्या बाजूने आहे त्याचा दुरुपयोग होता कामा नये. नाती जोडणे नाती जोपासणे नाती बांधून ठेवणे हे आपल्या महिलांचेच काम आहे. अन्याय अत्याचार विरुद्ध आपण स्वतः लढायला शिकलं पाहिजे असे आवाहन केले तर निवासी नायब तहसीलदार सातपुते, पोलीस उपनिरीक्षक मुकणे, पशुधन अधिकारी डॉ काटे यांनी देखील वेगवेगळे दाखले देत महिलांच्या शौर्याचे कौतुक करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप यांनी तर सूत्रसंचालन संघटनेचे सचिव प्रा विजय कापसे व अंगणवाडी पर्यवेक्षिका उमा खोल यांनी केले .उपस्थित मान्यवरांचे व पत्रकार संघटनेचे आभार महिला व बाल विकास अधिकारी रुपाली धुमाळ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीते साठी तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, कार्याध्यक्ष किरण ठाकरे, सचिव विजय कापसे, शहराध्यक्ष हफिज शेख, उपशराध्यक्ष स्वप्नील कोपरे, कार्याध्यक्ष बिपीन गायकवाड यासह फकिरराव टेके, किसन पवार, विनोद जवरे, सोमनाथ डफाळ, संजय लाड, रवी वाघडकर, गोविंद वाकचौरे, अक्षय काळे,राहुल कोळगे आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी अथक परिश्रम घेतले.
राज्य पत्रकार संघाच्या कोपरगाव शाखेच्या वतीने महिला दिनी अंगणवाडी सेविकांचा केलेला सन्मान सोहळा हा नक्कीच राज्यासाठी रोल मॉडेल ठरणार असून भविष्यात संघटनेच्या वतीने सर्वच तालुक्यातील अंगणवाडी सेविकाचा भव्य दिव्य सन्मान सोहळा करण्यात येईल.
डॉ विश्वास आरोटे
प्रदेश सरचिटणीस राज्य पत्रकार संघ

