पुण्य वार्ता
बुलढाणा/प्रतिनिधी/
गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीक्षा भूमी ते मंत्रालय संवाद यात्रेचा समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता. या यात्रेच्या माध्यमातून विविध पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आज केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या चर्चेत पत्रकारांचे संरक्षण, मानधन वाढ, अधिस्वीकृतीसाठीची प्रक्रिया सुलभ करणे, आणि पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे यांसारख्या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे, उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव डॉ. अनिल रहाणे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रा सुभाष लहाणे. आनंद दिघे इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, दैनिक समर्थ गांवकरी समूहाचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर दैनिक समर्थ गांवकरी मेहकर प्रतिनिधी सुनील मोरे.यांची उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाच्या वतीने मांडलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकार यावर आवश्यक ती कार्यवाही करेल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी दिले.
ह्यावेळी पत्रकार संवाद यात्रा पत्रकार संघटनेच्या हक्कांच्या लढ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे, अशी भावना राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केली.


