पुण्य वार्ता
अकोले – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत लोकशाही बळकटी करण्यासाठी अकोले उमेद अभियानातील 4500 महीला स्वयं सहायता समुह यांनी सहभाग घेतला आहे. उमेद अभियानातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती स्वतः शेताच्या बांधावर जाऊन मतदान जाणीव करत आहे. सर्व समूहातील महिला सोबत चर्चा करून मीटिंग घेऊन जाणीव जागृती करत आहोत. सर्व महिला एकत्र येऊन मतदान करण्यासाठी प्रतिज्ञा घेत आहोत. पथ नाट्ययातून मतदानाचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवण्यात आले ,ओव्या गाऊन, रांगोळी काढून, तसेच समूहातील महिलांच्या हातावर मेहेंदी काढून छान जाणीव जागृती कऱण्यात आली. नवीन मतदार यांनाही मतदान कसे आणि का करायचे या बाबत जागृत केले. गावागावात मशाल फेरी काढून मतदार “राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” “18 वर्षाचे वय केले पार, घेऊया हातात मतदानाचा अधिकार” अशा प्रकारे घोषणा देण्यात आल्या.
अकोले तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात भातच्या शेतावर जाऊन जाणीव जागृती सुरू आहे. समुदाय संसाधन व्यक्ती, सीआरपी, कृषी सखी, पशु सखी यांचा गावातील स्वयंसहायता समूहाचा महीलाशी खुप निकट संबंध येतो. आपण महिलांनी मतदान केल्याचे फायदे तोटे सांगून त्यांना त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त केले जाते आहे. अकोले विधानसभा मतदारसंघातील उमेद अभियानातील 2000 पेक्षा जास्त स्वयंसहायता समूह व 150 ग्रामसंघ यांनी आम्ही गावातील महिला सर्वजणी मतदान करू अश्या पद्धतीने लेखी ठराव घेतला. उमेद अभियानातील महिलांना सेवा सुविधा, हक्क ,अधिकार ,काय काय असतात हे सांगण्यात आले.
भावी पिढी संस्कारक्षम घडावी यासाठी जसे प्रयत्न करतो तसेच भावी पिढीला समृद्ध सुदृढ लोकशाही मिळावी यासाठी महिलांनी तसेच प्रत्येक नागरिकाने मतदान करायला हवे. “उमेदच्या महिला वाढवणार मतदानाचा टक्का, आता महिला करणार शंभर टक्के मतदान” या घोष वाक्यानुसार स्वतःसह इतर महिलांनाही महत्व पटून दिले जात आहे महिलाची मतदानाची टक्केवारी वाढवण्यात आपला सहभाग असावा असा निर्धार महिलांनी करावा असे आव्हान देखील करण्यात आले. उमेद अभियानातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती सर्वोत्तरी तालुक्याचे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहेत. अकोले तालुका उमेद अभियान तालुका प्रमुख तालुका अभियान व्यवस्थापक कुंदन कोरडे, तसेच सोमनाथ गुंजाळ, कुलदीप पाटील, अमर कोळी यांचे सहकार्य लाभत आहे.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर सर यांचे मार्गदर्शनाखाली अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेद अभियाना अंतर्गत स्वयंसहायता समूहातील महिला सीआरपी, कृषी सखी, पशु सखीच्या माध्यमातून गाव पातळीवर रांगोळी स्पर्धा, सामूहिक शपथ तसेच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन रॅली काढून भारुड कथन उपक्रमातून मतदानदारांची जाणीव जागृती करत आहे. ही बाब विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मधील नावीन्यपूर्ण व अधोरेखित करणारी आहे. संपूर्ण अकोले विधानसभा मतदारसंघात तसेच विशेष करून आदिवासी दुर्गम भागात उमेदच्या महिलांमुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. – गटविकास अधिकारी विकास चौरे

