पुण्य वार्ता
अकोले : तालुक्यातील स्वयंसहाय्यता बचत गट अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि स्वीप समिती यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नामुळे विधानसभेच्या निवडणुकीत अकोले विधानसभेत मतदानाचा टक्का निश्चित वाढेल असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी व्यक्त केला. अकोले तालुका पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मतदान जागृती कक्ष अर्थात स्वीप यांनी विविध मतदान जागृतीपर आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात यादव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी विकास चौरे होते.
अनुपसिंह यादव पुढे म्हणाले, आपण केलेले मतदान जागृतीचे काम उल्लेखनीय असून दोन दिवसांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होण्याच्या दृष्टीने मतदान जागृतीच्या कामात सातत्य ठेवावे. शकील बागवान यांनी प्रास्ताविक केलेल्या कार्यक्रमासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, नोडल अधिकारी सविता कचरे, मंडलाधिकारी सुरेखा वाकचौरे, समन्वयक कुंदन कोरडे, प्रकल्प अधिकारी श्रीमती एम् एस चव्हाण, श्रीमती गवारे एस पी. केंद्रप्रमुख स्वाती अडाणे, आदी उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे राजूर प्रकल्प कर्मचाऱ्यांनी रॅम्प वॉक च्या माध्यमातून मतदार जागृती केली. राजूर व अकोले येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांना विशेष कार्याबद्दल ट्रॉफी दिली तर स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिला मनीषा अस्वले, कुमशेत व शोभा भरीतकर टाकळी यांना देखील विशेष पारितोषिके देवून गौरविण्यात आले. तसेच समता कराळे व अलक पवार- भोंडला गीत, रेखा कांबळे – गायकवाड – मी सावित्रीबाई फुले बोलतेय…. , एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अकोले- पथनाटय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राजूर- रॅम्प वॉक/फॅशन शो द्वारे मतदान जनजागृती करणारे अर्चना एखंडे – एकपात्री, राजेश पवार- महिला गीत यांना देखील सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वीप नोडल अधिकारी सविता कचरे यांचे मार्गदर्शनाखाली स्वीप सहायक
शकील बागवान,सदस्य सुरेखा वाकचौरे, डावरे सुरेखा, वायळ विमल, वेडे तारा व बोठे मनिषा यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिल कुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन पिराजी पवार यांनी केले.
