पुण्य वार्ता
अकोले ता. १८ विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदारांना मतदान करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी निवडणूक विभागातर्फे अकोले मतदारसंघातील मतदारांना व्होटर स्लीपचे घरपोच वाटप करण्यात आले आहे. या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यादव यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुका निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. अकोले विधानसभा मतदारसंघासाठी ०२ लाख ६६ हजार १२९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून ३०७ मतदान केंद्र राहणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १ हजार ५८७ अधिकारी कर्मचारी कार्यरत असतील. तसेच २५ बस, १० जीप, 3 स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच ६६२ पोलिस अधिकारी, पोलीस कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी असलेल्या व्होटर स्लीपचे वाटप पूर्ण झाले आहे. तरी ज्या मतदारांना व्होटर स्लीप मिळाली नाही त्यांनी आपल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी संपर्क करावेत असे सहायक निवडणूक अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी सांगितले आहे. या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. विविध माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
