पुन्य वार्ता
संगमनेर ( प्रतिनिधी)– छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहे त्यांचा प्रेरणादायी इतिहास हा सीबीएससीच्या अभ्यासक्रमात अवघ्या 68 शब्दाचा असून अत्यंत निषेधार्य आहे तातडीने यामध्ये दुरुस्ती करून हा महाराष्ट्राचा प्रेरणादायी व ज्वलंत इतिहास संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात समावेश करावा अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार तांबे यांनी लक्षवेधी द्वारे सरकारकडे ही मागणी केली. यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की,
राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे आता CBSEच्या धर्तीवर NCERTचा अभ्यासक्रम सर्वच शाळांमध्ये लागू होणार असून, हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, या अभ्यासक्रमातील पहिली ते दहावीच्या CBSE इतिहासाच्या अभ्यासक्रमात एकूण 2200 पानं असताना, त्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ 68 शब्दांत उल्लेख करण्यात आला आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना शिकवला गेला पाहिजे, यासाठी शासनाच्या वतीने तातडीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचा इतिहास अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे. परंतु, केवळ 68 शब्दांत त्यांचं योगदान मांडणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे आ. सत्यजीत तांबे यांनी म्हंटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रासह देशातील विद्यार्थ्यांना समजावा, यासाठी एससीईआरटीने (SCERT) एनसीईआरटीला प्रस्ताव पाठवला असला तरी, या गंभीर मुद्द्यावर मंत्र्यांनी स्वतः दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणे आवश्यक होते, असे मत तांबे यांनी व्यक्त केले होते. त्यांनी शासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, यावर शासनाची पुढची भूमिका काय आहे, असा प्रश्न आ. तांबे यांनी उपस्थितीत केला.
या मुद्द्यावर उत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, CBSEचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) तयार करते, तर राज्यस्तरीय अभ्यासक्रम राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) तयार करते. त्यांनी आ. सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं मान्य करत सांगितलं की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव अभ्यासक्रमात झाला पाहिजे
राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात दिल्लीला जाऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास CBSE च्या सातवी व दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सन्मानपूर्वक समाविष्ट होण्यासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आलं आहे. या मुद्द्यावर सरकार गंभीर असून, आवश्यक तो सर्व पाठपुरावा करण्यासाठी आ. सत्यजीत तांबे यांच्यासह आम्ही सर्वजण दिल्लीला जाऊ असे आश्वासन देखील राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.



