पुण्य वार्ता
अकोले : निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. हौलीनलाल गौईटे (भा.प्र.से) यांनी रविवारी अकोले तालुक्यातील विविध मतदानकेंद्रांना भेट देऊन मतदान केंद्र आणि परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांचे संपर्क अधिकारी अपर प्रवरा सब डिव्हीजनचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, तलाठी अमोल लांघी, BLO शंकर गिहे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मतदारांसाठी उपलब्ध पायाभूत सोयी आणि सुविधांचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे व्यवस्था केली असल्याची खात्री करून घेतली. विशेषतः दिव्यांग मतदारांसाठी सुलभ व्यवस्थापन याची पाहणी केली. मतदान प्रक्रियेदरम्यान सुव्यवस्था राखण्यासाठी मतदारांसाठी सुरळीत प्रवेश, मार्गदर्शक सूचना, दिशादर्शक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती याबाबत त्यांनी माहिती घेतली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी निःपक्षपाती आणि सतर्क राहावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
