पुण्य वार्ता
अहील्यानगर/प्रतिनिधी/
राज्यातील सहकार क्षेत्राने अनेक दशकांपासून बळीराजाला आधार दिला असून, जिल्हा सहकारी बँकांनी या क्षेत्राला वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सहकार सोसायटींच्या माध्यमातून कर्जवाटप करत, त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात या बँकांचा मोलाचा वाटा आहे. या माध्यमातून शेतकरी सक्षम होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत आहे.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आदर्श कारभार,
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बळीराजा, व्यापारी वर्ग, सेवानिवृत्त कर्मचारी, बीडी कामगार, आणि छोट्या उद्योजकांसाठी कर्जपुरवठा व ठेवींचे संरक्षण करत आर्थिक स्थैर्य निर्माण केले आहे. ग्रामीण भागातील पतसंस्था चळवळीत पारनेर व अकोले तालुक्यातील ठेविदारांचा आजही बँकेवरील विश्वास अबाधित आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये सहकार चळवळ विस्तारली असून मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांची जाळीही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.
जिल्हा निबंधकांचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन आणि बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे या सहकारी संस्थांनी ठेवीदारांचा विश्वास संपादन करत राज्यभर आदर्श प्रस्थापित केला आहे.
सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था: कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पेंचा सन्मान,
आशिया खंडातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांनी काल दैनिक समर्थ गावकरी व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.
दैनिक समर्थ गावकरी समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांना साल, पुष्पगुच्छ, व साईबाबांची मूर्ती देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्यांमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ. विश्वास आरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रगतशील शेतकरी शिवाजीराव नाईकवाडी (मामा), अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे गुणवंत अधिकारी भारत वाकचौरे, भारतीय जनता पक्षाचे प्रांतिक सदस्य आणि मुळा परिसरातील प्रगतशील शेतकरी राम तळेकर हे मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा सहकारी बँकांची भूमिका आणि भविष्य,
जिल्हा सहकारी बँकांनी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला उभारी देण्याबरोबरच सहकार चळवळीत नवा आदर्श निर्माण केला आहे. बळीराजा, व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहून या बँका केवळ आर्थिक सेवा देत नाहीत, तर सामाजिक उत्तरदायित्वाचीही पूर्तता करत आहेत. त्यामुळे या सहकारी संस्थांचा आदर्श राज्यातील इतर संस्थांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.


