पुण्य वार्ता
मुख्य संपादक अशोक उगले
एक वृत्तपत्र विक्रेता ते वार्ताहर अन एक वार्ताहर ते स्व दैनिकाचा संपादक, ग्रामीण भागातील तालुका पातळीवरील पत्रकार संघटना ते देश पातळी वरील पत्रकार संघटनेचे सरचिटणीस, शिक्षणासाठी झालेली परवड ते अमेरिकन विद्यापीठाची डॉक्टरेट असा चित्रपट कथानकातील प्रवास ज्यांचा वाटतो ते म्हणजे पत्रकारांचं चालत बोलत व्यासपीठ डॉ. विश्वासराव आरोटे होय...
पत्रकारिता करताना निस्वार्थी पणाची भावना अंगीकारून पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अमृतवेल वाढविण्याचे काम व ग्रामीण पत्रकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम करून देणारे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे हे होय.
विश्वासराव आरोटे हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या कळसूबाई च्या शिखर रांगा मधील अहिल्यानगर जिल्ह्यातील चितळवेढे ता. अकोले या छोट्याशा डोंगर कुशीतील आणि प्रवरामाईच्या तिरावर असलेल्या गावी त्यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची होती. प्राथमिक शिक्षण जन्मगावी तर माध्यमिक शिक्षण मा. मधुकरराव पिचड माध्यमिक विद्यालय राजुर येथे पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण अकोले महाविद्यालयात पूर्ण केले.

परिस्थिती सामान्य असल्यामुळे शिक्षण घेत असताना सकाळी चितळवेढे येथून दूध टाकण्याचे व वर्तमानपत्र वाटण्याचे काम करित असे. वर्तमानपत्र वाटत असताना वाचनाची आवड निर्माण झाली. वर्तमानपत्र वाचता वाचता आपण पण पत्रकार व्हावे असे मनात इच्छा निर्माण झाली. पत्रकारीतेची झालेली ओळख आज त्यांना उच्च पदावर घेऊन गेली. ग्रामीण भागात वृत्तपत्र पोचवून ग्रामीण भागातील खप वाढवायचा असेल तर त्या भागातील समस्या समजून घेऊन वृत्तपत्रात त्याची मांडणी होणे आवश्यक आहे याची जाणीव विश्वासरावांना झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातूनच आपल्या पत्रकारीतेचा श्रीगणेशा केला आणि ग्रामीण भागातील समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ध्येयवेडी स्वप्ने उराशी बाळगून कर्तव्य करत राहिले यावेळी ग्रामीण भागातील वास्तव मांडताना अनेक अडीअडचणी आल्या. परंतु मुळातच अकोले तालुक्याला विचारांचा वारसा लाभलेला असल्यामुळे पत्रकारीता क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांशी त्यांची विचारसरणी जुळली. मार्गदर्शनाची दिशा मिळत गेली. कर्तृत्व आणि नेतृत्व याचा सुरेख संगम अस्तित्वात आला. बातमीदारी त्यांना मोठ्या पदावर घेऊन गेली. वार्ताहर म्हणून अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केल्या नंतर तालुका प्रतिनिधी आणि नंतर विभागीय कार्यालयाचे उपसंपादक म्हणून त्यांनी ‘दैनिक गांवकरी’ या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. गांवकरीच्या माध्यमातून ग्रामीण भागाची, या भागातील ग्रामस्थांची विश्वासार्हता जपली. लेखणीला चालना देता देता ग्रामीण भागातील वास्तव मांडतांना व वृत्तपत्रात काम करत असताना ग्रामीण भागातील पत्रकारांशी त्यांची नाळ जोडली गेली त्यातूनच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांची उकल झाली. समस्या सोडवण्यासाठी काही तरी केले पाहिजे या उद्देशाने संघटन बांधणी सुरू केली. त्यांचे प्रश्न आपल्या लेखनीच्या माध्यमातून सातत्याने मांडले. पत्रकारीता करत असतानाच ग्रामीण भागातील पत्रकारांशी देखीलत्यांची नाळ जोडली गेली. या पत्रकारांच्या समस्या त्यांना आपल्या समस्या वाटू लागल्या. या समस्या सोडविण्यासाठी काही तरी केले पाहिजे, असे सारखे वाटत होते. त्यांनी ग्रामीण भागात काम करणार्या पत्रकारांची मोट बांधली. सर्वांना बरोबर घेऊन अकोले तालुका ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली. या पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांसाठी खर्या अर्थाने कार्य सुरु केले. हे काम करत असतानाच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे यांचा संपर्क आला. दोघांचेही ध्येय एकच..पत्रकारांच्या समस्या सातत्याने मांडून त्यासाठी राज्यस्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे. ध्येय्य एकच असल्याने या जोडगोळीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाच्या माध्यमातून एकत्रित काम सुरु केले.
पत्रकारांसाठी चालविल्या जात असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय अधिवेशने घेतली. जिल्ह्यात, तालुक्यात विविध मेळावे घेतले. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील पत्रकारांना या पत्रकार संघामध्ये सामावून घेतले. प्रत्येकाला संघाचे ओळखपत्र देऊन नवी ओळख दिली. सर्वच जिल्ह्यातील पत्रकारांचा विमाकाढून खर्या अर्थाने पत्रकार संघ या पत्रकारांसाठी काम करत असल्याचा विश्वास निर्माण केला. संघटनेच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अहमदनगर जिल्हाध्यक्ष आणि नंतर राज्य सरचिटणीस या पदावरकाम करण्याची संधी दिली. राज्य कार्यकारिणीवर काम करतानाच त्यांचे काम अतिशय जोमाने सुरु झाले.
स्पर्धा परीक्षांबरोबरच क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या गुणवंतांचा राज्यस्तरावर गौरव पत्रकार संघाच्या माध्यमातून केला जात आहे. पंडीत श्रीश्री रविशंकरजी यांनाही पत्रकार संघाने गौरविले आले. हलाखीची परिस्थिती असणार्या पत्रकारांना औषधोपचारासाठी व इतर गरजा भागविण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही विश्वासराव आरोटे यांनी केला आहे. अशा राज्यभरातून अनेक पत्रकारांना संघटनेने आर्थिक मदत केली आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, बाळासाहेब विखे, सुशिलकुमार शिंदे, समाजसेवक अण्णा हजारे, राज्यपाल के. विद्यासागरराव, विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील, दिवंगत गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री आ. अजित पवार आदींकडे त्यांनी सातत्याने पत्रकारांच्या विविध समस्या मांडल्या.
पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी संरक्षण कायदा व्हावा यासाठी ते नेहमीच आग्रही राहीले. पत्रकारांवर होणार्या हल्ल्यांचा निषेध करत आरोपींना अटक होईपर्यंत पाठपुरावा केला. ग्रामीण भागातील पत्रकारांनाही श्रमिक पत्रकारांप्रमाणेच अॅक्रीडीशनकार्ड मिळावे, एस. टी. बस तसेच रेल्वेसारख्या विविध सवलती मिळाव्यात, शासनाने त्यांचा आरोग्य विमा काढावा, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, पत्रकारांना निवासासी व्यवस्था उपलब्ध करावी या व अशा अनेक मागण्यांसाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न विश्वासराव आरोटे करत आहेत. कोणताही पत्रकार असो त्यांना माऊली म्हणुन संबोधतात त्यामुळे ते अधिक जिव्हाळ्याचे सबंध प्रस्थापीत करतात.
पत्रकार संघाने मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल राज्यपाल विद्यासागरराव यांनीही घेतली होती.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वसंतराव मुंडे व डॉ. विश्वासराव आरोटे यांनी दिक्षा भूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई अशी पत्रकार संवाद यात्रा काढली. २२ मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना दिले. पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचे महामंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतला.
त्यांच्या कार्यकाळात अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असुन त्यांनी केलेल्या कार्याचा तो सन्मान आहे. पत्रकारांना विमा, हेल्मेट वाटप, आर्थिक मदत, कोरोना काळात अन्नधान्य व कपडे वाटप, गुणवंताचा सन्मान असे अनेक सामाजिक कार्याची दखल घेऊन अमेरिकन विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान केली.
“जे का रंजले गांजले त्यासी जो म्हणे आपले ” याप्रमाणे गरिबांना मदतीचा वसा ते अविरत पणे चालवत आहे.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने परमेश्वराकडे एकच मागेन की त्यांना भरपुर आयुष्य, चांगले आरोग्य मिळो. वाढदिवसाच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा….!
संकलन:-
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख,
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, नगर जिल्हा.

