पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- महामुनी अगस्ति ऋषी पालखी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व थकलेल्या ,दमलेल्या वारकरी, वैष्णवांची रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल मधील डॉक्टरानी व मेडिकल संचालक यांनी सुश्रूषा करून पांडुरंगाच्या चरणी सेवा रुजू केली.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर च्या विठू रायाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वैष्णवांची पाऊले पंढरीची वाटेकडे पडत आहेत.यावेळी ऊन,पाऊस ,थंडी यांची तमा न बाळगता वारकरी महिला पुरुष अगस्ति ऋषी च्या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन मोठ्या तन्मयतेने दि.२जुलै पासून दररोज २५ ते ३० किमी पंढरीकडे पायी वाटचाल करीत आहे. काल त्यांचा मुक्काम मिरजगाव येथील पाटील लॉन्स येथे मुक्कामाच्या ठिकाणी रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार व सदस्य असलेले डॉक्टर असे ९ पदाधिकारी दर्शनासाठी गेले होते .
दिंडीला भेटायला आलेल्या डॉक्टरांना पाहून थकलेल्या पाऊलांना आनंद झाला आणि वैष्णवांनी मोठया हक्काने आपले काय दुखते हे सांगायला सुरुवात केली.आणि मग काय एक डॉक्टर इंजेक्शन द्यायला,एक डॉक्टर गोळ्या द्यायला, एक डॉक्टर फोड आलेल्या पायांना मलम लावायला ,मेडिकलचे संचालक हाताला,पायाला मलम पट्टी बांधायला सुरुवात झाली, यावेळी रुग्ण आणि डॉक्टर यांचा एकमेकांविषयी आदर पाहून सर्वजण सुखावले.
लालतारा मेडिकल चे संचालक तथा रोटरी क्लब अकोले चे माजी अध्यक्ष सचिन आवारी यांनी ऑईनमेंट च्या ५०० ट्यूब देऊन वारकरी प्रति सेवा रुजू केली तर अकोले तालुका मेडिकल असोसिएशनने जवळपास ३५० वारकऱ्यांना सर्व प्रथमोपचार साहित्य,इंजेक्शन,मलमपट्टी, गोळ्या, औषधे देवून सेवा रुजू केली.
असे सेवा देणारे रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष डॉ.रवींद्र डावरे, उपाध्यक्ष डॉ जयसिंग कानवडे, बोर्ड ऑफ डायरेक्टर डॉ.संतोष तिकांडे, अरुणराव सावंत यांनी व त्यांचे सहकारी रोटरी चे विद्यमान अध्यक्ष बिद्याचंद्र सातपुते, उपाध्यक्ष दिनेश नाईकवाडी, माजी अध्यक्ष सचिन देशमुख, भावी सेक्रेटरी गंगाराम करवर यांनी व या सर्वांना संधी देणारे रोटरी चे पब्लिक इमेज असलेले हभप दीपक महाराज देशमुख थकलेल्या ,दमलेल्या वैष्णवांना आराम मिळावा , त्यांच्या मध्ये पुन्हा नव्या दमाने उत्साह निर्माण म्हणून सुश्रूषा करून त्यांच्यातील पांडुरंगा चे दर्शन व महामुनी अगस्ति ऋषी पालखी मधील पादुकांचे दर्शन घेऊन अकोलेकडे मार्गस्थ झाले. यावेळी अगस्ति ऋषी पालखी दिंडी च्या वतीने रोटरी क्लब च्या सर्व उपस्थित सदस्य यांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले.
चौकट- महामुनी अगस्ति ऋषी पालखी दिंडी सोहळ्यात सहभागी असलेल्या वारकरी रुग्णांना स्व:खर्चाने सलग १४ वर्ष दिवसाआड सेवा देणारे अकोले येथील डॉ.विराज शिंदे यांचेही सर्व स्तरातून कौतूक होत आहे.


