पुण्य वार्ता
संगमनेर खुर्द :(संजय गोपाळे )
संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील युवक संकेत निवृत्ती गोपाळे (वय 18 ) व संकेतचे चुलत मेहुणे अकोले तालुक्यातील ढोकरी येथील चेतन बाळासाहेब शेटे यांचे मोटार सायकल व कंटेनरच्या भीषण धडकेत अपघात होऊन जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की,दिनांक 14 शनिवार रोजी सकाळी संकेत गोपाळे व त्याचे मेहुणे चेतन शेटे हे दोघेजण घोटी या ठिकाणी आयुर्वेदिक औषध आणण्यासाठी गेले होते.
परंतु घोटी वरून परत येत असताना एस एम बी टी हॉस्पिटल पासून तीन किलोमीटरच्या अंतरावर त्यांचा समोरून येणाऱ्या कंटेनरला मोटर सायकलची जोराची धडक झाल्याने संकेत गोपाळे हा जागेवर ठार झाला असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले व चेतन शेटे यांना उपचारासाठी तातडीने ऍम्ब्युलन्स द्वारे हलवण्यात आले. परंतु चेतन शेटे यांचा देखील उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
सदर घटनेची खबर कळताच संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील सरपंच संदीप गोपाळे व संकेत चे वडील, नातेवाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व घटनेची माहिती घेत पोलीस प्रशासनाच्या मदतीने उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह नासिक सिविल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले.
या घटनेमुळे संगमनेर व अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे.
उत्तरीय तपासणीनंतर चेतन शेटे, अकोले तालुक्यातील ढोकरी, व संकेत गोपाळे, संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द या ठिकाणी अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार होणार आहे.
