पुण्य वार्ता
संगमनेर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्वाधिक महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या समित्यांपैकी एक असलेल्या लोक लेखा समितीवर (Public Accounts Committee) आमदार सत्यजीत तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभ्यासू वृत्ती, स्पष्ट आणि प्रभावी मांडणी, व्यापक जनसंपर्क आणि युवकांमधील लोकप्रियता यामुळे विधानपरिषदेत ठसा उमटवलेल्या आमदार तांबे यांची ही निवड महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष लक्षवेधी ठरली आहे.
विधानमंडळ सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार, लोक लेखा समितीवर आमदार तांबे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती राज्य शासनाच्या खर्चावर, आर्थिक निर्णयांवर आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालावर आधारित चौकशी व शिफारसी करणारी अत्यंत प्रतिष्ठेची संसदीय समिती आहे. या समितीचे अध्यक्षपद विरोधी पक्षनेत्याकडे असते, आणि सध्या ते काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार भूषवत आहेत.
या निवडीमुळे युवकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तांबे यांच्यावर आता राज्याच्या आर्थिक पारदर्शकतेसाठी जबाबदारीची नवी जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्यांनी यापूर्वीही विधी, आरोग्य, शिक्षण, शेती, पदवीधरांचे प्रश्न, विनाअनुदानित संस्थांचे विषय, तसेच डॉक्टर, वकील, इंजिनियर यांच्याशी संबंधित अनेक विषय विधान परिषदेत अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहेत.
राजकीय दृष्टिकोनातून पाहता, ही निवड त्यांच्या सततच्या जनसंपर्क, सर्वसामान्यांशी बांधिलकी, आणि विधिमंडळातील सक्रीय सहभागाची पावती मानली जात आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील ५४ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती व कामगिरीद्वारे मतदारांचा विश्वास संपादन केला आहे.
थोर स्वातंत्र्यसैनिक आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या परंपरेचा वारसा चालवत, लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजीत तांबे यांनी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक, शैक्षणिक आणि युवकविषयक कामांना प्राधान्य दिले आहे. अत्यंत नम्र पण ठाम नेतृत्व, भाषिक कौशल्य, राज्यभरातील कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत ओळख आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सलोखा हे त्यांचे विशेष गुण वैशिष्ट्य म्हणून ओळखले जातात.
सत्यजीत तांबे यांची लोक लेखा समितीवर झालेली ही निवड म्हणजे केवळ त्यांच्या कार्यक्षमतेचीच नव्हे, तर महाराष्ट्रातील युवकांच्या आवाजाला मिळालेली अधिकृत आणि जबाबदारीची भूमिका आहे. त्यांच्या या निवडीचे उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.

