पुण्य वार्ता
अकोले :-
मी अकोले तालुक्यात पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर येथील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा मी घेतला. त्यानंतर सामाजिक चळवळी आणि शाळा यांची माहिती घेताना मला सर्वात पहिले उंचखडक बु येथील शाळेचे नाव अनेक व्यक्तींनी सांगितले. तेव्हापासून शाळेत येण्याची इच्छा होती. ती आज पुर्ण झाली आहे. एसएमसीचे अध्यक्ष ऍड. सागर शिंदे आणि त्यांच्या टिमने जे काम केले त्याची माहिती मी माझ्या गावातील सोशल मीडियाच्या गृपवर टाकत असतो. अशा प्रकारच्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळा आदर्शवत झाल्या पाहिजे असे प्रतिपादन अकोले तालुक्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी केले. ते बाल आनंद मेळाव्यात खाऊगल्लीचे उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, ज्येष्ठ पत्रकार अमोल शिर्के, आबासाहेब मंडलिक, अभिजित मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
बोरसे म्हणाले. की, एखादी बंद पडलेली शाळा पुन्हा नव्याने सुरु करणे सोपे नाही. येथे शाळा सुरु करुन वर्षभरात आयएसओ मानांकन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात निवड, उपक्रमशिल शाळा पुरस्कार आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक, शाळेत वाचनालय, २४ तास इंटरनेट, सर्व भौतिक सुविधा आणि विशेषत: पुर्ण आठवडाभर बाल आनंद मेळावा आयोजित करुन उपक्रम घेणे हे फार कौतुकास्पद आहे. शाळेत मुलांना भाजीमार्केट भरविणे आणि आर्थिक ज्ञान संपादन करणे, आपल्या आईला जी पाककला येते त्याला व्यसपिठ निर्माण करुन त्याची विक्री करणे, भाषण स्पर्धा, सहल, प्रश्नमंजुशा, नाटीका, स्नेहसंमेलन, पालकांचे हळदी-कुंकू अशा विविध गोष्टी शाळेत आयोजित केल्या जातात याचे फार कौतुक वाटते. त्याहून पालकांना धन्यवाद म्हणले पाहिजे. की, बाजार घेण्यासाठी आणि खाऊगल्लीत संपुर्ण गाव सहभागी होतो. यापेक्षा लोकसहभागाचे उत्तम उदा. काय असू शकते. जेव्हा प्रत्येक शाळेला रवि रूपवते यांच्यासारखे उपक्रमशिल व आदर्श शिक्षक व एसएमसीला चांगले अध्यक्ष लाभतील तेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तेच्या पटलावर कायम झळकताना दिसतील.
मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य म्हणाले की, आपण सर्वजण झेडपी शाळेतून पुढे आलो आहोत. याच शाळेतील मुले आज देशात नव्हे तर जगात वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत. पुर्वी शाळेला जीवन शिक्षण मंदिर असे नाव होते ते योग्य होते. कारण, खरोखर येथे जगावे कसे याबाबत ज्ञान दिले जाते. त्यामुळे आज देखील झेडपी शाळांचे महत्व कायम आहे. उंचखडक बु ही शाळा गेल्या वर्षभरात देशाच्या पटलावर झळकली आहे. खरंतर एखाद्या गोष्टीमुळे लोकप्रियता मिळविणे फार सोपे असते. मात्र, मिळाली लोकप्रियता टिकवून ठेवणे हे फार अवघड काम असते ते काम या शाळा व्यवस्थापनाने केले आहे. त्यामुळे, त्यांचे कौतुक केले पाहिजे असे वैद्य म्हणाले. यावेळी अकोले टाईम्स नेटवर्कचे संपादक अमोल शिर्के यांनी देखील शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
२६ जानेवारी २०२५ रोजी अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पत्नी सौ. पुष्पाताई लहामटे यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या बाल आनंद मेळाव्यात मुलांची वक्तृत्व स्पर्धा, नाटीका, शाळेत भाजी मार्केट, खाऊगल्ली, शिवनेरी किल्ल्याची शैक्षणिक सहल, प्रश्नमंजुशा, स्नेहसंमेलन असे अनेक उपक्रम पार पडले. दि. ४ फेब्रुवारी रोजी आदर्श शिक्षिका सुनिता रुपवते यांच्या व्याख्यानाने सांगता करीत हळदी-कुुंकवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व महिला पालकांना बक्षिस वितरण व पाणी पिण्याच्या बाटल्या देऊन या सप्ताहाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऍड. सागर शिंदे, मुख्याध्यापक रवि रुपवते, सागर देशमुख, संदिप खरात, भाऊसाहेब देशमुख, महेश खरात, शितल देशमुख, हर्षदा देशमुख, संगीता गावंडे, अक्षय देशमुख, अभिजित मंडलिक, उद्धव देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी भाऊमामा खरात, सरपंच सुलोचना शिंदे, जगन देशमुख, मनोहर देशमुख, बाळासाहेब देशमुख, सोपान देशमुख, रविंद्र देशमुख, अनिल देशमुख, राजेंद्र शिंदे, भागवत देशमुख, सुरेश शिंदे यांच्यासह गावातील सहाशे ग्रामस्थ उपस्थित होते.
